Uddhav Thackeray : गणेशोत्सव तोंडावर आला तरी गणेशोत्सव मंडळांच्या समस्या सोडवण्यात पालिका आणि राज्य सरकारने सपशेल अपयशी ठरले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यावरून ही ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात मंगळवारी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी बैठक घेतली. या बैठकीचे नंतर सभेत रुपांतर झाले. त्यावळी मार्गदर्शन करताना, उद्धव ठाकरे यांनी सरकारचा समाचार घेतला.
समस्या अद्याप कायम…
मुंबईतील गणेशोत्सव मंडळाच्या समस्या अद्याप कायम आहेत. आताचे सरकार निर्बंध आणि नियमांच्या आडून गणेशोत्सवावर बंधन आणत असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान विघ्नहर्ता गणरायाचा गणेशोत्सव साजरा करत असताना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे त्यांनी आवाहन मंडळांना केले. शासनाकडे वारंवार तक्रारी करून त्यांना न्याय मिळत नाही. कोरोनासारख्या महामारीत ही सण उत्सव आपण साजरे केले होते. तो काळ महाभयंकर होता, अन्यथा तुमच्या समस्या त्याच वेळी सोडवले असत्या असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मंडळांची पळवा पळवी सुरु…
दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सरकारचा त्याकडे कानाडोळा आहे. त्यामुळे जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, चाकरमान्यांना सुस्थितीत चांगले रस्ते मिळत नाहीत. तोपर्यंत दंड भरू नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले. आता निवडणुका जवळ आल्याने गणेश मंडळाची पळवा पळवी सुरू केली आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी, शिवसेना (ठाकरे) डगमगणार नाही.
उलट गणेशोत्सवाची परंपरा कायम राखणे आणि हे नाते टिकवण्यासाठी कायम सोबत राहूया, असे आवाहन केले. तसेच मुंबई महापालिका सतत आपल्याकडे होती, यापुढेही आपल्याकडेच राहिल असा निर्धार व्यक्त केला.





