Marathi News

वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला असला तरी पावसाळी उपाययोजनांना वेग द्यावा, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश

Written by:Astha Sutar
Last Updated:
सखल परिसरांमध्ये पावसाचे पाणी शक्यतो साचणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घ्यावी. जोरदार पावसाने पाणी साचताना आढळल्यास त्याचा वेगाने निचरा होईल, यासाठी सजग राहून प्रयत्न करावेत.
वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला असला तरी पावसाळी उपाययोजनांना वेग द्यावा, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश
Bhushan Gagrani – राज्यातील विविध भागात सोमवारी पावसाने जोरदार बॅटींग केली. मुंबईसह उपनगरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई केली. या तुंबलेल्या पावसाच्या पाण्यामुळं मेट्रोचे तसेच मुंबईकरांचे मोठे नुकसान झाले. आता यावरुन मुंबई पालिकेनं अधिक सतर्क झाली आहे. पाऊस जरी लवकर दाखल झाला तरी यंत्रणा सुसज्ज ठेवावी, असे निर्देश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत.

नालेसफाई एका आठवड्यात करा…

दरम्यान, दरवर्षाची तुलनेत मुंबईत यंदा पंधरा दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. नाल्यांमधून गाळ उपसण्याच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. असे असले तरी पावसाळी कामांचा वेग कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ नये. जोरदार पावसामुळे महानगरपालिकेच्या कामांवर काहीसा परिणाम झाला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आधीच्या नियोजनामध्ये योग्य त्या सुधारणा कराव्यात, आवश्यक ते बदल करावेत. तसेच नदी, नाल्यांमधून गाळ उपसा करण्याची कामे पुढील आठवड्यात पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेत.

नागरी सेवा-सुविधांना प्रथम प्राधान्य…

अतिसखल व पावसाळी पाणी साचणारी नवीन ठिकाणे आढळली आहेत, त्या ठिकाणांची संबंधित प्रशासकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळाचे उपायुक्त यांनी पाहणी करावी. दरवर्षाच्या तुलनेत पंधरवड्यापूर्वीच मान्सूनचे मुंबईत आगमन झाले आहे. परिणामी नाले स्वच्छता, रस्ते व इतर कामांवर देखील काहीसा परिणाम झाला ही वस्तुस्थिती आहे. असे असले तरी नागरी सेवा-सुविधांची सर्वोच्च प्राथमिकता लक्षात घेता पावसाळी उपाययोजनांमध्ये जास्तीत-जास्त वेग द्यावा आणि कामे पूर्ण करावीत, असे निर्देश भूषण गगराणी यांनी दिले.
Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews