Marathi News

अवघ्या 40 रूपयांत मिळणार पीकविमा; मुदत नेमकी किती? कुठे करायचा अर्ज?

Written by:Rohit Shinde
Last Updated:
पीक विमा योजनेत सीएससी केंद्रावर विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी ४० रुपये शुल्क केंद्र सरकारने निश्चित केले आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्त्याव्यतिरिक्त इतर शुल्क देऊ नये,’ असे आवाहन कृषी विभागाने केले.
अवघ्या 40 रूपयांत मिळणार पीकविमा; मुदत नेमकी किती? कुठे करायचा अर्ज?

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीने राज्यात पंतप्रधान पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत पीक विमा योजना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे यामध्ये पुढील प्रक्रिया कशी, विमा भरण्यासाठी किती खर्च येणार, या सर्व बाबी सविस्तरपणे समजून घेऊयात…

शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदत 

पंतप्रधान पीक विमा योजनेत सीएससी केंद्रावर विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी ४० रुपये शुल्क केंद्र सरकारने निश्चित केले आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्त्याव्यतिरिक्त इतर शुल्क देऊ नये,’ असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. प्रधानमंत्री पीकविमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असून, शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे,’ असेही आवाहन विभागाने केले आहे. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के आहे.

खरिपातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी (राणी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या पिकांसाठी शेतकऱ्यांना भाग घेता येईल,’ असे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पीकविम्याचे महत्व मोठे आहे.

योजनेचा अर्ज कसा भरायचा?

https://pmfby.gov.in या पोर्टलवरूनही अर्ज भरता येईल. योजनेत भाग घेण्यासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई-पीक पाहणी बंधनकारक आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक, ७-१२ उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र बँकेत देणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारने निश्चित केलेले शुल्क संबंधित विमा कंपनीमार्फत ‘सीएससी’ विभागाला दिले जाते. एखाद्या अर्जदाराने फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला पुढील किमान पाच वर्षे काळ्या यादीत टाकून सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. ई-पीक पाहणी, विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज भरताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews