मराठवाडा-विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पुरस्थिती; शेतीचे मोठे नुकसान

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्राच्या पूर्व भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, हिंगोली, नांदेड, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला.
मराठवाडा-विदर्भातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पुरस्थिती; शेतीचे मोठे नुकसान

महाराष्ट्रात सर्वदूर परतीच्या पावसाने कहर केला आहे. मुंबईसह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आगामी काही दिवस पावसाची ही स्थिती अशीच राहण्याच्या हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना अधिकची सतर्कता बाळगावी लागणार आहे.

मराठवाडा-विदर्भात पावसाचे धुमशान

महाराष्ट्राच्या पूर्व भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, हिंगोली, नांदेड, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, गोदावरी, दुधना, पूर्णा आणि सरस्वती नद्या दुथडी भरून वाहत आहेत. चारनेर पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला. अहिल्यानगरच्या पाथर्डीतील हनुमानबाग परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक जनावरं वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बिबेआंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

कापूस आणि फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यापाऱ्याचा जीव गावकऱ्यांच्या मदतीने वाचवण्यात आला. विष्णुपूरी धरणाचे बारा दरवाजे उघडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार!

यंदाच्या मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या १५ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचेही विभागाने म्हटले आहे. सध्याच्या कमी दाबाच्या क्षेत्रापाठोपाठ बंगालच्या उपसागरात २० सप्टेंबरच्या दरम्यान आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्या क्षेत्रामुळे राज्यातील पावसात पुन्हा वाढ होऊ शकते. राज्यातून मान्सून माघारी फिरण्याचा सर्वसाधारण कालावधी ५ ते १४ ऑक्टोबर आहे. पावसाची सध्याची स्थिती पाहता राज्यातून मान्सून सर्वसाधारण वेळेआधी माघारी फिरण्याची शक्यता कमी असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

भारतीय हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केलाय. मराठवाड्यातीलही काही भागांमध्ये आज पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. कोकणात हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केलाय. मुंबईमध्ये रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच आहे. मुंबईत सकाळी अतिमुसळधार पाऊस सुरू झाला आहे. विजांच्या कटकटाडासह पाऊस सुरू आहे. नागरिकांनी या काळात आवश्यक ती सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews