लाडक्या बहिणींना दे धक्का! आता पती किंवा वडिलांची e-kyc करणे बंधनकारक, तुमचे 1,500 बंद होणार?

Written by:Rohit Shinde
Published:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. कारण महिलांना आता स्वत:सोबत वडिल अथवा पतीची ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे.
लाडक्या बहिणींना दे धक्का! आता पती किंवा वडिलांची e-kyc करणे बंधनकारक, तुमचे 1,500 बंद होणार?

लाडकी बहीण योजनेचे निकष डावलत लाभ घेणाऱ्या महिलांची धाकधुक वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाखो बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. त्यामुळे आता सरकारने योजनेच्या प्रत्येक निकषाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. लाभार्थी महिलेला आता स्वत:सोबत वडिलांची किंवा पतीची देखील ई केवायसी करावी लागणार आहे.

महिलेसोबत पती किंवा वडिलांचे उत्पन्न तपासणार!

योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. केवळ लाभार्थी महिलेचेच नाही, तर त्या महिलेचे पती किंवा वडिलांचे ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, सरकार आता लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासोबतच तिच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न पडताळून पाहणार आहे.

लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, ही या योजनेची मुख्य अट अशी आहे. आता या नियमाची अंमलबजावणी अधिक कठोरपणे केली जाणार आहे. जर महिलेचे लग्न झाले असेल, तर पतीचे उत्पन्न तपासले जाईल आणि लग्न झाले नसल्यास वडिलांचे उत्पन्न विचारात घेतले जाईल. त्यामुळे अधिकचे उत्पन्न आढळून आल्यास संबंधित महिला योजनेतून बाहेर पडणार आहे.

ई-केवायसी कशी करायची? 

  • लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
  • संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
  • तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल. प्रोसेस पूर्ण होईल.

पती/वडिलांचे तपशील आणि घोषणापत्र

लाभार्थी पात्र असल्यास तिला पुढील टप्प्यातील ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यात पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर संमती दर्शवून OTP टाकून Submit करावे. त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील गोष्टी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील. माझ्या कुटुंबातील सदस्य शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत नियमित/कायम कर्मचारी म्हणून कार्यरत नाहीत किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. या बाबी प्रमाणित करून Submit बटण दाबल्यानंतर “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

2 महिन्यांत इ-केवायसी करून घ्या! (Ladki bahin yojana e-kyc)

चालू आर्थिक वर्षात हे परिपत्रक जारी झाल्यापासून 2 महिन्यांच्या आत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या लाभार्थ्यांनी या कालावधीत आधार प्रमाणीकरण केले नाही, ते पुढील कार्यवाहीसाठी पात्र ठरतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.  तसेच, भविष्यात दरवर्षी जून महिन्यात ही ई-केवायसी प्रक्रिया 2 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असेल. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ असून, ती भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही उपयुक्त ठरेल, असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews