मुंबईत मेट्रो-3 वरील स्थानकांत मोफत WiFi ची सुविधा; नेटवर्कच्या समस्येवर तोडगा, प्रवाशांना दिलासा

Written by:Rohit Shinde
Published:
गेल्या काही दिवसांपासून मेट्रो मार्गावर मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या उद्भवली आहे. या समस्येवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अखेर महत्त्वपूर्ण तोडगा काढला आहे.
मुंबईत मेट्रो-3 वरील स्थानकांत मोफत WiFi ची सुविधा; नेटवर्कच्या समस्येवर तोडगा, प्रवाशांना दिलासा

मुंबई मेट्रो ३ ला मिळणारा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक आहे. ही भूमिगत मेट्रो लाईन सुरू झाल्यानंतर प्रवाशांना प्रवासात मोठी सोय झाली आहे. कोलाबा ते सीप्झपर्यंतचा मार्ग वेळेची बचत करतो आणि वाहतूक कोंडीपासून दिलासा देतो. परंतु इंटरनेट सुविधेत येणाऱ्या अडथळ्यांमुळे प्रवासी बऱ्याचदा हैराण होत. मात्र आता स्थानकांवर फ्रि वायफाय सुविधा उपलब्ध होणार आहे.

मेट्रो-3 वरील स्थानकांत मोफत WiFi

गेल्या काही दिवसांपासून मेट्रो मार्गावर मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या उद्भवली आहे. या समस्येवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अखेर महत्त्वपूर्ण तोडगा काढला आहे. आता मेट्रो-३ मार्गिकेतील सर्व स्थानकांवर प्रवाशांसाठी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मेट्रो-३ मार्गिका ही पूर्णपणे भूमिगत असल्यामुळे मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क स्थानकांमध्ये आणि बोगद्यांमध्ये नीट काम करत नव्हते. यामुळे प्रवाशांना विशेषतः ई-तिकीट काढताना मोठी गैरसोय होत होती. तसेच अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन एमएमआरसीने ही मोफत वाय-फाय सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सुविधेमुळे प्रवाशांना स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी Metro Connect 3 ॲपद्वारे लॉगिन करून अगदी सहजपणे आणि जलद गतीने ई-तिकीट काढता येणार आहे. ज्यामुळे त्यांचा वेळ वाचेल आणि तिकीट काढताना होणारी गैरसोय दूर होईल. ही सुविधा प्रवाशांचा मेट्रो प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर आणि तंत्रज्ञान-आधारित बनवेल. विशेष म्हणजे, मेट्रो-३ चा शेवटचा म्हणजेच आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा टप्पा नुकताच ९ ऑक्टोबर रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला आहे.

मेट्रो- 3 ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद 

मुंबई मेट्रो ३ ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. या भूमिगत मेट्रो लाईनमुळे प्रवाशांना शहरातील गोंधळलेल्या रस्त्यांवरून मुक्तता मिळाली आहे आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या वाचतो. कोलाबा ते सीप्झपर्यंतच्या मार्गावर प्रवाशांची गर्दी सुरू झाल्यामुळे मेट्रोची गरज अधोरेखित झाली आहे. आधुनिक सुविधा, स्वच्छ डबे, सुरक्षितता उपाय आणि फ्री वायफायमुळे प्रवासी मेट्रोला पसंती देत आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी तसेच पर्यटनासाठी प्रवाशांचा मोठा सहभाग दिसून येतो, ज्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवचैतन्य मिळाले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews