Marathi News

मुंबईत गणेश विसर्जनाची लगबग, भक्तांची गर्दी; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार अून त्यासाठी बरीच तयारी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनही विसर्जनासाठी सज्ज झाले असून विविध ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबईत गणेश विसर्जनाची लगबग, भक्तांची गर्दी; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात

मुंबईत गणपती विसर्जनाचा आज भव्य सोहळा पार पडत आहे. पोलिसांनी प्रथमच AI तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. लालबागचा राजा, गणेश गल्ली, आणि इतर प्रमुख गणपतींचे विसर्जन वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. खरंतर गणेश भक्तांनी देखील मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

 10 दिवस सेवा केल्यानंतर आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येणार आहे. हा दिवस लहान मुलांसोबत मोठ्यांसाठी देखील भावूक करणारा असतो. बाप्पाची सेवा केल्यानंतर आज थाटामाटात बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या या नाम घोषात बाप्पाला आज निरोप दिला जाईल. गणपती विसर्जनासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभर यंत्रणा सज्ज झालेली पाहायला मिळत आहे.

मुंबईतील चौपाट्यांवर पालिकेसह पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. आज ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत गणेश विसर्जनाच्या दिवशी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरभरात तब्बल 25 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मुंबईत 10 हजार पालिका कर्मचारी देखील तैनात करण्यात आले आहे.

गणेशभक्तांसाठी आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. लाडक्या बाप्पाची 11 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर लाडक्या गणरायाचे विसर्जन केले जाणार आहे. राज्यभरातील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील गणपतींना निरोप देण्यात येणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे.

राज्यभरात आज श्री गणेशाचे विसर्जन

भक्तांना आशिर्वाद देणारा गणपती बाप्पा आता पुन्हा घरी निघाला असून गणरायासाच्या विसर्जनासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झाला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार अून त्यासाठी बरीच तयारी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनही विसर्जनासाठी सज्ज झाले असून विविध ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. चार हजार कॅमेरे पोलीस दल आणि दामिनी पथक सज्ज आहे. तर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीची लगबग सुरू झाली असून उत्तर पूजा झाल्यानंतर अकरा वाजता विसर्जन मिरवणूक निघेल. 105 वर्षाची परंपरा असलेल्या चिंचपोकळीचा चिंतामणी या गणरायाची आरतीच्या तालावर विसर्जन मिरवणूक काढली जाते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews