सर्वसामान्य ग्राहक, औद्योगिक क्षेत्रालाही वीज दर कपातीचा फायदा होणार; मुख्यमंत्री फडणवीसांची विधानपरिषदेत माहिती

Written by:Rohit Shinde
Published:
ता मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक वीज दर सुद्धा स्वस्त होणार असल्याची घोषणा केली आहे. सर्वसामान्य ग्राहकांसोबत औद्योगिक क्षेत्रालाही वीज दर कपातीचा फायदा होणार आहे.
सर्वसामान्य ग्राहक, औद्योगिक क्षेत्रालाही वीज दर कपातीचा फायदा होणार; मुख्यमंत्री फडणवीसांची विधानपरिषदेत माहिती

राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणेच आता औद्योगिक वीज ग्राहकांना सुद्धा सरकारने एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात औद्योगिक वीज दर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी होणार आहेत. नवीन टॅरिफनुसार सध्या महाराष्ट्राचा दर 8.32 रुपये आहे, जो पुढील टप्प्यात 7.38 रुपयांवर येणार आहे. यामुळे आगामी काळात सर्वसामान्य ग्राहकांसोबत औद्योगिक क्षेत्रालाही वीज दर कपातीचा फायदा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सद्यस्थितीला राज्याच्या तुलनेत तमिळनाडूचा दर 9.04 रुपये, गुजरात 8.98 रुपये आणि कर्नाटक 7.75 रुपये इतका आहे. पुढील काही वर्षांत महाराष्ट्रात औद्योगिक वीज दर कमी राहील. तसेच टॅरिफ ट्रू-अप प्रक्रियेमुळे दर वाढणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले. सदस्य अभिजीत वंजारी यांनी राज्यातील वीज दरवाढ कमी करण्यासंदर्भात करत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती विचारली. यावेळी सदस्य शशिकांत शिंदे, सतेज उर्फ बंटी पाटील आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपप्रश्न विचारले.

5 वर्षांत 26 टक्के दर कपात होणार

राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीज दर कमी होणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक वीज दर सुद्धा स्वस्त होणार असल्याची घोषणा केली आहे. विद्युत खरेदी आता ‘मेरीट ऑर्डर डिस्पॅच’ पद्धतीने केली जाणार आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांकडून स्वस्त दरात वीज खरेदी केली जाते. तसेच सोलर, विंड आणि बॅटरी स्टोरेजच्या वापरामुळे विजेच्या खरेदीची किंमत मोठ्या प्रमाणात घटली आहे. हे दीर्घकालीन (25 वर्षांचे) करार असल्यामुळे विजेचे दर स्थिर राहतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

100 युनिट्सच्या आतील वापरावर कपात

आधीच्या टॅरिफ पिटिशनमध्ये रहिवासी ग्राहकांवर भार टाकून इंडस्ट्रियल आणि कमर्शियल दर कमी केले गेले. परंतु यावरील आक्षेपांमुळे आता सगळ्याच कॅटेगरीमध्ये दर कमी झाले आहेत. 70 टक्के ग्राहक 100 युनिटखाली विजेचा वापर करणारे असून त्यांना 26 टक्के दरकपात मिळणार आहे. त्याचबरोबर, 100 युनिटच्या वर वापरावरही दरकपात होणार आहे. त्यामुळे हा एक मोठा दिलासा मानला जात आहे. शेती सौरपंप आणि स्मार्ट मीटर्स बाबत आगामी काळात वेगाने पाऊले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews