नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थिती आता नियंत्रणात असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील एकूण 93 मंडळापैकी 69 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. कंधार व माळाकोळी मंडळात सर्वाधिक 284 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, SDRF, CRPF, नांदेड महानगरपालिका व स्थानिक शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू आहे. नांदेड जिल्ह्यावर अद्यापही पावसाचे सावट कायम असल्याची माहिती समोर येत आहे.
शासनाकडून आपत्ती निवारणासाठी उपाययोजना
पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय सैन्य दलाच्या बटालियनला बोलवण्यात आले. बिलोली, मुखेड, कंधार, लोहा, हदगाव, भोकर, देगलूर, किनवट, मुदखेड, हिमायतनगर, धर्माबाद, उमरी, अर्धापूर व नायगाव तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील गोदावरी, मानार, मांजरा, लेंडी, आसना नद्यांना पूर आला आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी
जिल्ह्यातील पाच हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. तिघांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. नांदेडच्या उमरी रेल्वे स्टेशन अधीक्षक यांचा मृत्यू झाला. विष्णुपुरी प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडले आहेत. 1 लाख 20 क्युसेसने विसर्ग सुरू आहे. उमरी तालुक्यातील बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याचे सर्व 16 दरवाजे उघडले आहे. लिंबोटी धरणाचे 12 दरवाजे उघडले आहेत. लाखो हेक्टर शेती पिकाचे नुकसान झाले आहे.
नांदेड येथे मुसळधार पाऊस सुरु आहे, 500 नागरिक अडकले आहेत, सरकारची तयारी काय? यावर फडणवीस यांनी उत्तर दिलं. “नांदेडमध्ये “खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. जी काही वरच्या भागातली धरणं आहेत, त्यातून अधिक वेगाने पाणी सोडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे, बाजूच्या राज्यांशी चर्चा केलेली आहे. लोकांना बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे. पाण्याचा वेग पाहता लष्काराला पाचारण केलेलं आहे. परिस्थिती प्रशासन योग्य प्रकारे हाताळत आहे.






