Marathi News

पुण्याला तुफान पावसाने झोडपलं; पुणेकरांची दैना…ठिकठिकाणी घरांत शिरलं पाणी!

Written by:Rohit Shinde
Published:
पुणे शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. खडकवासला धरणातून विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. तसेच घरांत पाणी शिरलं आहे.
पुण्याला तुफान पावसाने झोडपलं; पुणेकरांची दैना…ठिकठिकाणी घरांत शिरलं पाणी!

पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर पुण्यातील मोठा नदीचे पात्र देखील वाढले आहे. लोणावळा लगतच्या मळवली ते देवळे गावचा संपर्क तुटला आहे. ओढे-नाल्याच्या ठिकाणी पाणी रस्त्यावर आलं आहे. पुणे-लोणावळा रेल्वेतून हा परिसर कसा जलमय झाला आहे. सकाळी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं. आता पावसाने थोडी विश्रांती घेतल्यानं परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे. सध्या मळवली ते देवळे गावच्या ग्रामस्थांना लोणावळा मार्गे वळसा मारावा लागत आहे.

खडकवासलातून विसर्ग होणार

खडकवासला धरणातून दुपारी दोन‌ वाजता दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार आहे. त्याआधीच मुठा नदीत ओढ्या – नाल्यांचे पाणी आल्याने नदीची पाणीपातळी वाढली आहे. डेक्कन भागातील भिडे पुल गेले काही महिने वाहतुकीसाठी बंद आहे. मात्र वाढलेल्या पाण्यामुळे पुलाच्या कठड्यांपर्यंत पाणी पोहचलं आहे. धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ठिकठिकाणी घरात शिरले पाणी

पुण्यात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः कोथरूड, सिंहगड रोड आणि इतर काही भागांमध्ये पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असून काही कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले जाण्याची शक्यता आहे.

राज्यात पावसाचा जोर कायम

राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल झाला असून मागील 12 तासांत पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तीन चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव आणि सक्रिय मान्सून यामुळे पावसाची तीव्रता वाढली आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. नवी मुंबई, पालघर आणि रायगडमध्येही वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews