Marathi News

राज्याच्या बहुतांश भागात आज मुसळधार पावसाची शक्यता; कोकण, घाटमाथ्याला अलर्ट, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

Written by:Rohit Shinde
Published:
राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात या काळात चांगला पाऊस होईल.
राज्याच्या बहुतांश भागात आज मुसळधार पावसाची शक्यता; कोकण, घाटमाथ्याला अलर्ट, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

राज्यात गणेश चतुर्थीच्या काळात पावसाचे जोरदार कमबॅक पाहायला मिळणार आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाध्याला हवामान विभागाने ऑरेन्ज अलर्ट दिला आहे तर, मुंबई, ठाणे आणि पुण्यासह संपूर्ण कोकणसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या काळात विशेष सतर्कता बाळगावी, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

मराठवाडा-विदर्भात पावसाचा अंदाज

पुढील तीन दिवस म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहतील आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या विभागांमधील जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

घाटमाथा – कोकणात पाऊस बरसणार

मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्याला पावसाच ऑरेन्ज अलर्ट देण्यात आला आहे. या भागाती नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुंबई, ठाणे आणि पालघरसह संपूर्ण कोकणाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

देशातील 16 राज्यांमध्ये पाऊस बरसणार!

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रासोबतच पश्चिमी विक्षोभ आणि चक्रीवादळीय वाऱ्यांचा प्रभाव यामुळे देशभरातील विविध राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल होत आहे. मान्सून ट्रफ सध्या त्याच्या सामान्य स्थितीजवळ असून याचा परिणाम म्हणून देशाच्या बहुतेक भागांत पाऊस वाढला आहे. एकूणच, देशातील १६ राज्यांमध्ये पुढील दोन ते पाच दिवसांपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews