पुढील 48 तासांत विदर्भ-मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

Written by:Rohit Shinde
Published:
परतीचा पाऊस महाराष्ट्रात चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतोय...विदर्भ-मराठवाड्याला पुढील 48 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
पुढील 48 तासांत विदर्भ-मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रातील पावसाबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नवरात्रोत्सवावर पावसाचे संकट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, मदतीसाठी सरकारकडे मागणी अशा संपूर्ण परिस्थितीत मान्सूनचा परतीचा प्रवास विलंबाने होणार आहे. विदर्भ-मराठवाड्यासाठी पुढील 48 तास महत्वाचे आहेत.

विदर्भ-मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या 24 तासांत मराठवाड्यात तर 24 ते 27 सप्टेंबरदरम्यान विदर्भात अतिवृष्टीची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रावरील कमी दाबाचा पट्टा कमकुवत झाला असला तरी पश्चिम बंगालच्या खाडीत नवा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. 25-26 सप्टेंबर रोजी पुन्हा चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे हवामानात आणखी मोठे बदल संभवतात. विदर्भात 27-28 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवरात्री उत्सवावर पावसाचे सावट, काळजी घ्या!

यंदाच्या नवरात्रोत्सवावर पावसाचे सावट राहू शकते. वरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून गरब्यांवर पावसाचे सावट दिसणार आहे. त्यामुळे या नवरात्रीतही पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तास राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता हळूहळू कमी होईल.

पालघर, ठाणे आणि मुंबईत आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून पुढील 3 दिवसांत पावसाची तीव्रता हळूहळू कमी होईल. घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि तळ कोकण भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे.

मुसळधार पावसामुळे शेती-पिकांचे मोठे नुकसान

या वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास विलंबाने होणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. महाराष्ट्रातून मान्सूनची माघार 5 ते 10 ऑक्टोबरदरम्यान सुरू होण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यात अजून काही दिवस पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राला पावसाने झोडपले आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. साताऱ्यासह सोलापूरमध्येही लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सोलापूरच्या सांगोल्यातील कासारगंगा ओढ्याला नदीचे स्वरूप आले आणि त्यात दोन मुले वाहून गेली, त्यांचा मृत्यू झाला.

मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. लातूरमध्ये शेत शिवारात पाणी शिरले आणि अनेक पूल वाहून गेले, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली. बीडमध्ये नदीकाठच्या शेतजमिनी पिकांसह वाहून गेल्या. धाराशिवमध्येही शेतकऱ्यांचे तोडणीला आलेले पीक वाया गेले. विदर्भातील भंडाऱ्यात भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कृषी मंत्री यांनी सांगितले की, राज्यात 63 लाख 11 हजार एकर पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews