गेल्या जवळपास 15 दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाने गेल्या 50 वर्षांतील रेकॉर्ड मोडीत काढले आहे. शेती आणि पिकांची अतोनात हानी झाली. यामुळे राज्यातील बळीराजा हवालदिल झाला आहे. नुकसान भरपाई देत सरकारने आधार द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
63 लाख एकर क्षेत्रावरील पिके बाधित
महाराष्ट्राला पावसाने झोडपले आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत आहेत. साताऱ्यासह सोलापूरमध्येही लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. सोलापूरच्या सांगोल्यातील कासारगंगा ओढ्याला नदीचे स्वरूप आले आणि त्यात दोन मुले वाहून गेली, त्यांचा मृत्यू झाला.
मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात पावणेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. लातूरमध्ये शेत शिवारात पाणी शिरले आणि अनेक पूल वाहून गेले, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली. बीडमध्ये नदीकाठच्या शेतजमिनी पिकांसह वाहून गेल्या. धाराशिवमध्येही शेतकऱ्यांचे तोडणीला आलेले पीक वाया गेले. विदर्भातील भंडाऱ्यात भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कृषी मंत्री यांनी सांगितले की, राज्यात 63 लाख 11 हजार एकर पिकांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
‘लवकरच पंचनामे आणि नुकसान भरपाई’
राज्यातील पाऊस थांबल्याबरोबर शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरकार मदत करणार असल्याचं कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणालेत. राज्यातील जून, जुलै महिन्यातील नुकसानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाल्याचं ते यावेळी म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यभरात दाणादाण उडाली आहे . शेतकऱ्यांची पिक डोळ्यासमोर उद्वस्त झाली असून बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय . अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे .कर्जमाफी, नुकसान भरपाईवरून विरोधक आक्रमक होत असताना सरकारवर दबाव वाढतोय .
शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना मोठा फटका बसला असून डोळ्यासमोर पिकांचा चिखल झाल्याने शेतकरी हतबल झालाय .कृषिमंत्र्यांनी सांगितलं की, “राज्यात जून-जुलै महिन्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पंचनाम्यानंतर उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील लवकरच मदत मिळणार आहे.”






