राज्यात पुन्हा एकदा ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील 12 गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा प्रशासना आपत्ती निवारणासाठी उपाययोजना आखताना दिसत आहे. फक्त चंद्रपूरच नव्हे तर विदर्भातील वर्धा, नागपूर या जिल्ह्यांतही तुफान पावसाने हजेरी लावलेली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत
गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्व 33 दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आला असून नाले दुथडी भरून वाहत आहेत. जिवती, कोरपना, राजुरा, गोंडपिपरी, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा व पोंभुर्णा तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
नागपूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा
नागपूरमध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात रस्ते जलमय झाले आहेत. रामनगरमधील हिल रोड ते पांढरा बोडीकडे जाणारा मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यासाठी आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टीने नागपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी शाळा आणि महाविद्यालये आज एक दिवसासाठी बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार प्रशासनाने ही निर्णय घेऊन नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे.
. मान्सून सध्या सक्रीय अवस्थेत असल्याने कोकण किनारपट्टी, विशेषतः मुंबई, ठाणे आणि रायगड या भागांत पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. काही भागांत अतिवृष्टी होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शिवाय विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात या काळात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.






