राज्यावर अवकाळी पावसाचे ढग, पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज काय?

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यावर सध्या अवकाळी पावसाचे ढग जमा झाले आहेत, मुंबईत नुकताच पाऊस कोसळला आहे, तर राज्यातील इतर भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यावर अवकाळी पावसाचे ढग, पुढील काही तास धोक्याचे, हवामान विभागाचा अंदाज काय?

राज्यात सर्वदूर सध्या अवकाळी पावसाचे संकट घोंघावत आहे.  7 मे रोजी म्हणजेच आज काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. काल मध्यरात्री मुंबई आणि उपनगरांमध्ये झालेल्या पावसामुळे मोठी तारांबळ उडाली आहे. जोरदार वारे आणि पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली होती. हवामान विभागाने पुढील काही तासांत राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा दिला आहे.

पुढील काही तास धोक्याचे

हवामान विभागाने आज दिवसभरात राज्यात आणि कोकणपट्ट्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. यामध्ये हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार  महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसासह गारपिटीची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मधल्या काळात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, धाराशिव या जिल्ह्यांत तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट होऊ शकते असा अंदाज भारतीय हवामान विभागकडून  वर्तवण्यात आला आहे. वादळी वाऱ्याचा देखील इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली असून, जालना शहरासह जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली आहे.वादळी वाऱ्यासह जिल्ह्यातील अनेक भागांना गारपिटीचा देखील तडाखा बसला आहे.

मुंबई शहर, ठाणे आणि कोकणाला अलर्ट

राजधानी मुंबई, ठाणे परिसरात देखील पावसाचा अंदाज आहे. काल रात्री देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. या भागात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहत असून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे परिसरातील लोकल सेवेला यामुळे काल फटका बसला होता. आजही अगदी तशीच शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत होत आहे.

अवकाळीमुळे बळीराजा अडचणीत!

अवकाळी पावसामुळे मराठवाडा, विदर्भ , मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत मोठं नुकसान झालं. मोठी वित्तहानी झाली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट देखील झाली. द्राक्ष बागा, केळी बागा, भात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आणखी काही काळ गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याचं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल, सध्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी जोर धरत आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews