Maratha reservation : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन करत होते. आज आंदोलनाचा पाचवा दिवस. दरम्यान, आज अखेर आंदोलन संपले आहे. मेलो तरी चालेल…, पण आरक्षण घेऊनच उठणार आहे. असा इशारा जरांगे-पाटील यांनी काल राज्य सरकारला दिला होता. यानंतर आज राज्य सरकारच्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी याबाबत आंदोलन थांबविण्याची घोषणा केली. मात्र आजच्या सुनावणीत हायकोर्टाने काही निरक्षणं नोंदवली आहेत.
आझाद मैदान मोकळं करण्यासाठी उद्यापर्यंत मुदत
दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यात कोर्टाने काही महत्वाचे निरीक्षण नोंदवली आहेत. आझाद मैदान रिकामं करण्यासाठी हायकोर्टाकडून उद्या दुुपारपर्यंतची मुदत दिलेली आहे. मात्र सरकारनं अध्यादेश दिल्यानंतर गुलाल उधळत मराठा आंदोलक गावाकडे निघाले आहेत. तुम्हाला केवळ एका दिवसाची परवानगी दिलेली होती. त्यातही आंदोलकांची मर्यादा निश्चित केली होती, वाहनांची मर्यादा निश्चित केलेली होती. या सर्व मर्यादांचं उल्लंघन झालंय. त्यामुळे हे आंदोलन तातडीनं थांबवत आझाद मैदान परिसर मोकळा करा, असे आदेश हायकोर्टानं दिलेत.
पोलिसांकडून नोटीस
मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून आझाद मैदान तत्काळ रिकामं करण्यास सांगितलं आहे. या नोटिशीत, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचं आणि आंदोलनासाठी दिलेल्या परवानगीच्या अटी व शर्तींचं उल्लंघन केल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, 29 ऑगस्ट 2025 रोजी एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र त्या परवानगीच्या अटींचे पालन करण्यात आलं नाही. त्यामुळे, पुढील कोणतीही परवानगी देण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळं उद्या दुपारपर्यंत आंदोलन मागे घ्या असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. पण आज आंदोलन समाप्तीची घोषणा झाल्यानंतर मराठा आंदोलक गुलाल उधळत गावाकडे निघाले आहेत.





