Marathi News

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, गेल्या २४ तासात सर्वांधिक पाऊस कुठे?

Written by:Astha Sutar
Last Updated:
राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टसह यलो अलर्टही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, गेल्या २४ तासात सर्वांधिक पाऊस कुठे?

Maharashtra Rain : राज्यात मागील २४ तासांमध्ये (२२ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) पालघर जिल्ह्यात १९.८ मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात १६.३ मिमी, चंद्रपूर १२.३ मिमी, ठाणे जिल्ह्यात ११.१ मिमी आणि रायगड जिल्ह्यात ९.४ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर पुढील २४ तासांसाठी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून, मध्यम ते मुसळधार पाऊसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळं काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उंच लाटांचा इशारा…

दरम्यान, राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. तर कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील किल्ले सज्जनगड मार्गावर दरड कोसळली असून, दरड हटविण्याचे काम सुरु असल्याचे, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सांगितले आहे.

ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिवमध्ये हलक्या सरी तसेच मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या घाट परिसर, सातारा घाट परिसर आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews