Dengue Patients: महाराष्ट्रात डेंग्युच्या रूग्णांत मोठी वाढ; यंदाच्या पावसाळ्यात 9,728 रूग्ण आढळले !

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यात सप्टेंबर अखेरीस डेंग्यूचे 9728 रुग्ण आढळले. मुंबईमध्ये रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे, मात्र मृत्यूची संख्या घटल्याने दिलासा मिळाला आहे.
Dengue Patients: महाराष्ट्रात डेंग्युच्या रूग्णांत मोठी वाढ; यंदाच्या पावसाळ्यात 9,728 रूग्ण आढळले !

उन्हाळा संपताना तसेच पावसाळ्याच्या काळात डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचे प्रमाण वाढते. डासांच्या उत्पत्तीला या काळात पोषक वातावरण तयार होत असल्याने या काळात हे आजार उद्भवतात. पावसामुळे शहरात तसेच ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पाणी साचते आणि डासांच्या प्रजननासाठी अनुकूल वातावरण तयार होते. विशेषतः एडीस डास डेंग्यूचा तर अ‍ॅनोफिलीस डास मलेरियाचा प्रसार करतात. पाणी साचलेल्या जागा, नाले, गटारे आणि उघडी भांडी ही डासांची मुख्य उत्पत्तीस्थाने ठरतात. राज्यातील डेंग्यूच्या रूग्णांबाबत काहीसा धक्का देणारा असा आकडा आता समोर आला आहे.

राज्यात सप्टेंबर अखेरीस 9,728 रूग्ण

राज्यात सप्टेंबर अखेरीस डेंग्यूचे 9728 रुग्ण आढळले. मुंबईमध्ये रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे, मात्र मृत्यूची संख्या घटल्याने दिलासा मिळाला आहे. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसून आली. राज्यातील डेंग्यू तापाचा फैलाव वाढत असून यावर्षी सप्टेंबर अखेरीस हजारो रुग्ण आढळले. गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंखेत वाढ झाली असून आरोग्य विभागाने डेंग्यू नियंत्रण मोहिमेला गती दिली आहे.

जनजागृती आणि उपाययोजना सुरू

मॉन्सून तुलनेने शांत झाला आहे. मात्र, बुडालेले भाग आणि साचलेले पाणी डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांसाठी कारणीभूत ठरत आहेत. येत्या दिवसांत लेप्टोस्पायरोसिस  सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतोय. त्यामुळे बीएमसीने झोपडपट्ट्यांमध्ये फोगिंग, सॅनिटायझेशन आणि घराघरांमध्ये औषध वितरणाची मोहीम युद्धस्तरीय सुरू केली आहे. मुंबईत डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढतात. गेल्या पावसामुळे रुग्णसंख्या अचानक वाढल्याने बीएमसीच्या रुग्णालयांमध्ये मानसून वॉर्ड्स उभारण्यात आले आहेत.

डेंग्यू, मलेरियापासून बचावाच्या पद्धती

डेंग्यू आणि मलेरियापासून बचाव करण्यासाठी स्वच्छता आणि डास नियंत्रण महत्त्वाचे आहे. घराभोवती पाणी साचू देऊ नये, कारण डासांची उत्पत्ती तिथूनच होते. जुनी टाकी, कुलर, गटारे किंवा फेकलेल्या डब्यांमध्ये पाणी राहू देऊ नये. मच्छरदाणी, डासप्रतिबंधक क्रीम किंवा कॉइलचा वापर करावा. खिडक्यांना जाळ्या लावल्यास डास घरात प्रवेश करू शकत नाहीत. लहान मुलांना आणि वयोवृद्धांना विशेष काळजी घ्यावी. झोपताना पूर्ण कपडे परिधान करावेत. शासकीय आरोग्य विभागाकडून फवारणी व औषधोपचार वेळोवेळी केले जातात. योग्य प्रतिबंधक पावले उचलल्यास डेंग्यू आणि मलेरियापासून प्रभावी बचाव करता येतो आणि आरोग्य सुरक्षित राहते.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews