Devendra Fadnavis : मुंब्रा येथील रेल्वे अपघातांच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबई उपनगरीय लोकलचे डबे एसी करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री सकारात्मक आहेत. विशेष म्हणजे एसीचे डबे लोकलला जोडण्यात येणार असले तरी तिकिट दर प्रवाशांना परवडणारे असतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान सभेत दिली. अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत उत्तर दिले.
गुरुवारी घटना निंदनीय
विधान भवनाच्या लॉबीत जी घटना गुरुवारी घडली, ती निंदनीय आहे. तर मिडिया समोर कोण अश्लील घोषणा देतात, कोण म्हणतं विधान सभा अध्यक्ष मॅनेज होतात, असे विधान करणे योग्य नाही. संसदीय परंपरेचे पालन करणे सगळ्यांचीच जबाबदारी आहे. ‘ना हनी ना ट्रप’ ठोस पुरावे आणायचे आणि सत्ताधारी पक्षाची बोलती बंद करायची, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
गुरुवारी विधान भवनाच्या लॉबीत घटना घडली त्यात दोघांची नावे समोर आली असून बबन टकले यांच्यावर ६ तर नितिन देशमुख यांच्यावर ८ गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक विधान भवनात दाखल होतात, भविष्यात अतिरेकी घटना घडली तर जबाबदारी कोण घेणार, असा जोरदार हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
मेट्रो ३ ऑक्टोबरपर्यंत पूर्णतः प्रवासी सेवेत
मुंबई लोकलची मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. परंतु मुंबई उपनगरीय लोकल प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लोकलचे दरवाजे खुले असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे विस्तारले जात असून मेट्रो ३ ऑक्टोबरपर्यंत पूर्णतः प्रवासी सेवेत येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नवी मुंबई विमानतळचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी नुकताच आढावा घेतला.
हे विमानतळ सप्टेंबरपर्यंत सुरु होईल. पालघर तालुक्यातील वाढवणं बंदरांचे काम जलदगतीने सुरु आहे. जगातील पहिल्या २० देशात महाराष्ट्रातील वाढवणं बंदर असणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उद्धव ठाकरेंवर निशाणा!
हिंदी भाषा सक्तीचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या काळात झाला असून १ ली ते १२ वी पर्यंत हिंदी भाषा सक्ती करावी याला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्ती हवी कशाला या पुस्तकाचा संग्रह दिला. परंतु या संग्रहात त्यावेळी हिंदी भाषा सक्ती संदर्भात निर्णय घेतला त्याची वृत्तपत्रांची कात्रण ही पुस्तक संग्रहात लावून द्यावीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला.
क्राईम रेकॉर्डमध्ये घट
राज्यात चोरी, जबरी चोरी, दरोडा, खून अशा प्रकारच्या गुन्ह्यांत घट झाली असून २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये ६.७५ टक्क्यांनी कमी झाले आहे. सायबर गुन्ह्यांत ही घट झाली असून २०२२ मध्ये १६.४६ टक्के प्रमाण होते ते २०२४ मध्ये १९.४५ टक्क्यांवर आले आहे. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांत घट झाली असून २०२१ मध्ये २.७५ टक्के प्रमाण होते, तर आता १६ टक्के झाले आहे. बलात्काराच्या घटनांमध्ये तपासात निष्पन्न झाले आहे की, पिडित महिलेचे नातेवाईक यात सहभागी झाल्याचे समोर आले आहे.
पोलीस भरतीला वेग
राज्यात पोलिसांची भरती प्रक्रिया सुरु असून ३८ हजार ८०२ पोलिसांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आणखी १३ हजार पोलीस भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात ४९ हजार पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल आणि पोलीस दल अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकाच तिकिटावर सर्वंच प्रवास
मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो रेल्वेचे जाळे विस्तारले जात असून वांद्रे ते वर्सोवा, वर्सोवा ते दहिसर, दहिसर ते भाईंदर आणि थेट विरार असा प्रवास होणार असून विरार ते कुलाब थेट सागरी मार्गाने प्रवास करता येणार आहे.





