कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यास राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी खरंतर ही अभिमानाची बाब आहे, असेच म्हणावे लागेल. 22 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलं आहे. त्यामुळे यानिमित्ताने कोल्हापूरच्या शाही दसरा मेळाव्याला एक वेगळेच महत्व मिळताना दिसत आहे.
शाही दसरा मेळाव्याला विशेष महत्व
मैसूरच्या शाही दसरा सोहळ्याप्रमाणे कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला महत्त्व आहे. कोल्हापूरचा शाही दसरा हा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या दसऱ्याला मान आहे. संस्थान काळात हा शाही दसरा अतिशय उत्साही वातावरणात साजरा व्हायचा. त्याचा राजेशाही थाट कमी झाला असला तरी परंपरा जपणारा तो उत्साह आजही कायम आहे.
पूर्वी सोने लुटण्याचा सोहळा टेंबलाईवाडी येथील मोकळ्या माळावर होत होता. पण नंतर दसरा चौकात करण्यात येऊ लागला. जुना राजवाडा ते दसरा चौक दरम्यान निघणारा छबिना, त्यातील लवाजमा आणि करवीरकरांची मोठी गर्दी हे या शाही दसऱ्याचे खास वैशिष्ट्य. हा शाही थाट गेल्या अनेक वर्षापासून कायम राहिल्यानेच भारतात कोल्हापूरचा हा सीमोल्लंघन सोहळा चर्चेचा विषय ठरतो.
ऐतिहासिक शाही दसरा मेळावा
कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून हा मेळावा एक शाही सोहळा म्हणून साजरा होत आहे. या मेळाव्याची सुरुवात विजयादशमीच्या दिवशी होते. पारंपरिक शाही मिरवणुकीत हत्ती, घोडे, वाद्यवृंद, तलवारींची चमक आणि राजघराण्याचा शाही दरबार यांचा भव्य समावेश असतो. यामध्ये राज्यातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, तसेच हजारो नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक एकात्मतेचे प्रतीक आहे. अनेक वर्षांपासून कोल्हापूरचा दसरा मेळावा महाराष्ट्रातील लोकांच्या अभिमानाचे केंद्र राहिला असून आता त्याला राज्यस्तरीय प्रमुख उत्सवाचा दर्जा मिळाल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.






