Congress – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या विजयावर शंका घेणार लेख राहुल गांधींनी लिहिला आहे. यावर राजकीय पक्ष व नेत्यांच्या प्रतिक्रिया येताहेत, आता राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप झाला आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे भाजपाचे अमित शाह व देवेंद्र फडणवीस का देतात? निवडणूक आयोग गप्प का? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील फिक्सिंगची चौकशी का करत नाही? असा सवाल महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
मतदानाची चोरी करून भाजपा महायुती सत्तेत…
दरम्यान, राहुल गांधी यांनी संसदेत व संसदेबाहेरही हा प्रश्न लावून धरला आहे. देशातील प्रमुख वर्तमानपत्रात त्यांचा हा लेख प्रकाशित केल्याने राजकीय भूकंप झाला असून, निवडणूक फिक्सिंगच्या चौकशीची मागणी होत आहेस असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी म्हटले. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची चोरी करून भाजपा महायुती सत्तेत आलेत. अचानक वाढलेले मतदान हे अनौरस, बोगस असल्याने काँग्रेस पक्षाने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली पण चौकशी काही केली जात नाही, अशी टिका सपकाळांनी केली.
महाराष्ट्रात लोकशाहीचा निर्घृण खून – चेन्नीथला
दुसरीकडे लोकशाही संस्थाना ताब्यात घेऊन आपल्या फायद्यासाठी वाकवून कपट, फसवणूक करून महाराष्ट्रात जनमताची चोरी करण्यात आली. राहुल गांधी यांनी आकडेवारीसह मांडलेले सत्य हा फक्त निव्वळ लेख नाही, तर भारताच्या लोकशाहीवरील योजनाबद्ध केलेल्या आघाताचे सत्य उघड करणारा दस्ताऐवज आहे. तसेच महाराष्ट्रात लोकशाही पराभूत झाली नाही तर, तिचा निर्घृण खून करण्यात आला आहे, अशी घणाघाती टिका महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.
मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी करा- पटोले
रात्रीच्या अंधारात मतांवर दरोडा टाकून भाजपा युती निवडणूक आयोगाच्या मदतीने विजयी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत विजय मिळवलेल्या महाविकास आघाडीचा पाच महिन्यातच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव होतो हे अनाकलनीय आहे. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर निवडणूक आयोग पुराव्यासह खुलासा का करत नाही?, असा संतप्त सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार नाना पटोले यांनी विचारला आहे.





