State Cabinet Meeting : आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. एकूण सात निर्णय घेण्यात आलेत. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातील एक निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभागातील दोन निर्णय, महसूल विभागातील एक निर्णय,परिवहन विभाग एक निर्णय, वस्त्रोद्योग विभागातील एक निर्णय आणि नगरविकास विभागातील एक निर्णय, असे एकूण सात विभागातील महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
बैठकीत महत्वाचे निर्णय?
• महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण २०२५ जाहीर (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग)
• वाढवण बंदर ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग (भरवीर येथे) यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी. प्रकल्प आखणी व भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
• राज्य शासनाच्या छोट्या, चिंचोळ्या आकाराच्या, बांधकामास अयोग्य, उपयुक्त आकार नसलेल्या, सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लॅण्ड लॉक्ड स्वरुपातील भूखंडांच्या वितरण धोरणास मंजुरी. (महसूल विभाग)
• महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर. सुधारित धोरणास मंजुरी. (परिवहन विभाग )
• नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या १ हजार १२४ कामगारांना ५० कोटींचे सानुग्रह अनुदान मिळणार. सुतगिरणीच्या जमीन विक्रीतून निधीची तरतूद. (वस्त्रोद्योग विभाग )
• जळगांव जिल्ह्यातील मौजे पाचोरा येथील भुखंडावरील क्रींडागणाचे आरक्षण वगळून, त्याचा रहिवास क्षेत्रात समावेश करण्यास मान्यता. (नगरविकास विभाग)
• कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी सस्थांच्या अनुदानात वाढ, अनुदान २ हजारांवरून 6 हजार करण्यास मान्यता. (सार्वजनिक आरोग्य विभाग)
बैठकीआधी दोन महत्वाच्या बैठक्या…
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाच्या बैठक्या घेतल्या. कोल्हापूरातील नांदणी मठातली महादेवी हत्तीण गुजरातला नेल्यावरुन कोल्हापूरातील जनता रस्त्यावर उतरली आहे. महादेवी हत्तीणीला परत आणावे अशी जनभावना आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, सदाभाऊ खोत, राहुल आवाडे, अमल महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार सर्वश्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, विश्वजीत कदम, सतेज पाटील, अशोक माने,नांदणी मठाचे पूज्य स्वस्तीश्री जिनसेन महास्वामीजी, जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्यासोबत बैठक घेतली.
तर दुसरीकडे मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यावरुन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली होती. यात मंत्री मंगलप्रभात लोढा, संबधित अधिकारी आणि पक्षीप्रेमी या बैठकीला उपस्थित होते. तर दोन्ही बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.





