बाप्पााच्या परतीची वेळ आता जवळ आली आहे. शनिवारी ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणेशाचं विसर्जन होईल. पुण्यात दरवर्षी विसर्जनाची मोठी धूम असते. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात. याबाबतची नियमावली पुणे पोलिसांकडून जाहीर करण्यात आली आहे. मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी पुण्यातील मानाचे गणपती आणि मिरवणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दुसरीकडे पुण्यातील वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीत देखील महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बाबतीत सविस्तरपणे अधिक जाणून घेऊ….
पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल
पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुणे शहरातील मुख्य 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. तर 10 मुख्य रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यासह शहरात विविध ठिकाणी नो पार्किंग झोन असणार आहे. शहरात दोन दिवस जड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शहरात वाहतूक सुरळीत राहावी आणि गर्दी नियंत्रणात राहावी म्हणून पुणे पोलिसांनी दोन दिवस वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.
वाहतुकीसाठी बंद असणारे रस्ते
शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड ,केळकर रोड, टिळक रोड, जंगली महाराज रस्ता, कर्वे रोड, FC रोड, भांडारकर रस्ता पुणे सातारा रोड, प्रभात रोड
पुण्यातील मानाचे गणपती आणि मिरवणुकीचं वेळापत्रक
- सकाळी 9:15 वाजता: पहिला मानाचा कसबा गणपती मंडईतील टिळक पुतळ्यासमोर पोहोचेल.
- सकाळी 9:30 वाजता: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि हा गणपती बेलबाग चौकात पोहोचेल.
- सकाळी 10:15 वाजता: कसबा गणपती लक्ष्मी रोडकडे प्रस्थान करेल.
- सकाळी 10:30 वाजता: दुसरा मानाचा गणपती (तांबडी जोगेश्वरी) बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडकडे जाईल.
- दुपारी 1:00 वाजता: सहावा (महापालिका गणपती) आणि सातवा (त्वेष्ट कासार गणपती) मंडळ मिरवणुकीत सामील होतील.
- दुपारी 3:45 वाजता: लक्ष्मी रोड आणि शिवाजी रोडवरील मंडळे मुख्य मिरवणुकीत सामील होतील.
- दुपारी 4:00 वाजता: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीत सामील होईल.
- संध्याकाळी 5:30 नंतर: जिलब्या मारुती आणि अखिल मंडई गणपती मंडळे मिरवणुकीत सामील होतील.






