“आमच्या पोटात दुखण्याचे कारण…”; ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चेवर मनोज जरांगे काय म्हणाले?

Written by:Rohit Shinde
Published:
ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आमच्या पोटात दुखण्याचे कारण…”; ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चेवर मनोज जरांगे काय म्हणाले?

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर, आमचं पोट दुखायचं कारण नाही. अशा शब्दांत मनोज जरांगेंनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे, नेमकं मनोज जरांगेंनी काय म्हटलं आहे, ते सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरेंंच्या संभाव्य युतीवर जरांगे काय म्हटले?

ठाकरेंच्या संभाव्य युतीवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर, आमचं पोट दुखायचं कारण नाही. जुनी म्हण आहे की ‘मुंबईत पाहिजे तर ठाकरे पाहिजे’ कुठल्याही पक्षाचा असला तरी प्रत्येकाचे मत मुंबईत ठाकरेच असावेत असं होतं. पण ते कशासाठी म्हणत होते? माहिती नाही. असा टोमणा देखील त्यांनी लगावला आहे.

दोन भावांनी एकत्र यावं, वेगळे लढले तरी पडतात मग एकत्र येऊन पडू द्या, पण लोकांची इच्छा आहे ना, दोन ठाकरेंनी एकत्र यावं मग त्यांनी एकत्र यावं. लोकांची इच्छा आहे दोघांनी एकत्र यावं, त्यात आमचा काही फायदा नाही, एकदा होऊन जाऊ द्या, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे आज गुजरातवर बोलत आहेत, मात्र पुर्वी यांनीच गुजरातचा प्रचार केला, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलनाची हाक

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा उभारलेला आहे. त्यांनी अनेकदा उपोषण देखील केलं. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही त्यांची मुख्य मागणी आहे. दरम्यान त्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.

मराठा आणि धनगर वेगळा नसून एकच आहे, आम्ही वेगळे नव्हतो आणि यापुढे नसणार, कारण नसताना मराठा समाजाच्या आरक्षाणाला धनगरांचा विरोध नाही, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच, येत्या 29 ऑगस्टला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे, यावर बोलताना पहिल्यापेक्षा पाचपट संख्येनं अधिक मराठा समाज या मोर्चात सहभागी होईल, हा मोर्चा अंतरवाली सराटी मार्गे, अहिल्यानगर, शिवनेरी, माळशेज घाट, कल्याण मार्गे मुंबईत धडकणार आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या लढ्याची धग पुन्हा एकदा जाणवणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews