Marathi News

मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आंदोलक सज्ज; 29 ऑगस्टला मुंबईत ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी अभुतपूर्व आंदोलन!

Written by:Rohit Shinde
Published:
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकार विरूद्ध समाज असा संघर्ष होणार आहे.
मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठा आंदोलक सज्ज; 29 ऑगस्टला मुंबईत ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी अभुतपूर्व आंदोलन!

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान आणि मंत्रालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून सुरू होणार असून, तीन दिवसांनंतर मुंबईत आझाद मैदान व शासन दरबारी अर्थात मंत्रालयावर मराठा समाजाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे. जर आंदोलकांवर अन्याय झाला, तर गावागावातले मुख्य व दुय्यम रस्ते बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मुंबईतील या आंदोलनासाठी मराठा समाजाची तायरी सुरू आहे. लाखोंच्या संख्येने या आंदोलनात आंदोलक सहभागी होतील.

जरांगेंच्या मोर्चाचे नियोजन नेमके कसे?

जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावातून सुरुवात होणाऱ्या या मोर्चात हजारो मराठा बांधव सहभागी होणार असून, 29 ऑगस्टच्या रात्री मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन एकवटणार आहे. जरांगे यांचा मोर्चा 27 ऑगस्ट रोजी सकाळी आंतरवली सराटी येथून सुरू होणार आहे. त्यानंतर हा मोर्चा शहागड फाटा, साष्ट पिंपळगाव, आपेगाव, पैठण कमान, घोटण, शेवगाव, मिरी नाका, पांढरी पुल, अहिल्यानगर बायपास, नेप्ती चौक, आळाफाटा असा प्रवास करणार आहे. या मार्गावरून जाताना मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या टप्प्यात जुन्नर येथे मुक्काम होईल.

28 ऑगस्ट रोजी शिवनेरी किल्ल्यावर दर्शन घेतल्यानंतर मोर्चा पुन्हा मार्गस्थ होईल. त्यानंतर राजगुरुनगर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे सरळ आझाद मैदानाकडे मोर्चा वळेल. 29 ऑगस्टच्या रात्री मुंबईत पोहोचल्यावर या आंदोलनाचा उग्र रूप पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.नेमक्या या काळात मुंबईत गणेशोत्सवाची तयारी सुरू असते. शहरात लाखोंच्या संख्येने भाविकांचे आगमन होते. या गर्दीत जरांगे यांच्या मोर्चाचा समावेश होणार असल्याने प्रशासनाची मोठी कसोटी लागणार आहे. वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, आंदोलकांची सोय, याकडे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण  मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आगामी आंदोलन मुंबईतच  होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

‘विजयाचा गुलालही आपल्या अंगावरच उधळला गेला पाहिजे.” मागील दोन वर्षांपासून मराठा समाजासाठी आंदोलन सुरू असून, आता ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. “ही शेवटची लढाई मराठ्यांनी जिद्दीने आणि एकजुटीने पार पाडली पाहिजे,” असे आवाहनही जरांगेंनी मराठा बांधवांना केलं.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews