मुंबईत मेगाब्लॉकमुळे रविवारी प्रवाशांना मोठा मनस्ताप होणार; कोणत्या मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
रविवारी मुंबईत लोकल रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांना यावेळी मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. लोकलचे वेळापत्रक सविस्तर जाणून घ्या...
मुंबईत मेगाब्लॉकमुळे रविवारी प्रवाशांना मोठा मनस्ताप होणार; कोणत्या मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक जाणून घ्या!

रविवारचा दिवस हा मुंबईकरांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत असतो. मुंबईतील लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते. याच लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी ये-जा करत असतात. गणेशोत्सवात मुंबईतील विविध गणपती मंडळांतील गणरायाच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक गणरायाच्या दर्शनासाठी मुंबईत येतात. यापैकी बहुतांश भाविक हे लोकलने प्रवास करतात. तुम्ही सुद्धा रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. रविवारी मुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉकच्या वेळापत्रकाबाबत सविस्तर जाणून घेऊ…

मुंबईत रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरील सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल आणि दुरुस्ती, रेल्वे रूळ दुरुस्ती यासारख्या कामांसाठी रविवारी म्हणजेच उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. धीम्या मार्गावरील ब्लॉकमुळे चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकात लोकल थांबणार नाहीयेत. यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी तुम्ही लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा गणेशगल्ली यासोबतच आसपासच्या परिसरातील गणरायाच्या दर्शनाला जायचं ठरवलं असेल तर तुम्हाला नियोजनात थोडा बदल करावा लागणार आहे.

कसे आहे मेगाब्सॉकचे नियोजन?

सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत असणार आहे.

कुर्ला ते वाशी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असल्याने या वेळेत लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील गाड्या आणि पनवेल / बेलापूर / वाशीहून सकाळी 10.17 वाजल्यापासून दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 12.30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लक मुंबई सेंट्रल स्थानकावर घेण्यात येणार आहे. मात्र, रविवारी दिवसभर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाहीये. त्यामुळे मुंबईकरांनो रविवारी प्रवास करताना रेल्वेच्या वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवास करा. रेल्वेच्या वेळापत्रताबाबत सविस्तर जाणून घ्या आणि मगच घराबाहेर पडा….

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews