Rain Alert: नोव्हेंबर उजाडला, महाराष्ट्रात पावसाची स्थिती कायम; कुठे-कुठे बरसणार, उघडीप कधी?

Written by:Rohit Shinde
Published:
Last Updated:
महाराष्ट्रात 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस वगळता पावसाची उघडीप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तरी पावसाचे वातावरण अद्याप कायम आहे.
Rain Alert: नोव्हेंबर उजाडला, महाराष्ट्रात पावसाची स्थिती कायम; कुठे-कुठे बरसणार, उघडीप कधी?

नोव्हेंबर महिना उजाडला आहे. तरी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दोन कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून जोरदार पाऊस झाला. मोंथा चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने आता मात्र पावसाचा जोर कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी हलका पाऊस वगळता पावसाची उघडीप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पाहुयात 1 नोव्हेंबर रोजी आणि पुढील काही दिवस राज्यात हवामानाची स्थिती कशी असेल.

राज्यातील पावसाचा जोर ओसरणार?

1 नोव्हेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरासह कोकणामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये साधारणपणे ढगाळ आकाश आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात याच पद्धतीचे हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली.

उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून सायंकाळच्या वेळी आकाशामध्ये विजांचा कडकडाट होऊन हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस किमान तापमान 17 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येऊ शकते. छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये दमट हवामानासह कमाल तापमान 29 तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर आकाश साधारणपणे ढगाळ राहणार असून सायंकाळच्या वेळी विजांसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

विदर्भातील प्रमुख शहर असलेल्या अमरावतीमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल. तर दिवसभर दमट हवामान तर सायंकाळच्या वेळी हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल. तर नागपूरमध्ये सामान्यपणे ढगाळ आकाशासह दमट हवामान पाहायला मिळेल त्याचबरोबर हलक्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

पाऊस नेमकी कधी उघडीप देणार?

अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात झालेल्या हवामान बदलामुळे विदर्भासोबत कोकण किनारपट्टीवर भागात पाऊस कायम आहे. वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्रामुळे 5 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत चांगलीच भर पडली आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews