Yogesh Kadam : गणेशोत्सव काळात मुंबईत तसेच लालबागच्या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. गणेशोत्सवातील दहा दिवस मुंबईत गणेशभक्तांच्या उत्साहासह सुरक्षेचा महत्वाचा प्रश्न असतो. या धरतीवर आज मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गणेशोत्सव काळातील सुरक्षा उपाययोजना प्रभावीपणे अंमलात येत आहेत की नाही? याची आज त्यांनी पाहणी केली.
उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी…
या पाहणीदरम्यान पोलिस कंट्रोल रूम, सीसीटीव्ही कक्ष, दर्शन रांगा तसेच संपूर्ण परिसरातील सुरक्षा व्यवस्था तपासण्यात आली. दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्यामुळे मंडळ परिसरातील सुरक्षा उपाययोजनांची सविस्तर माहिती घेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तसेच त्यांनी काही सूचनाही दिल्या. यावेळी मंडळ आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून AI तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेची माहिती गृहराज्यमंत्री कदम यांना देण्यात आली.
AI च्या माध्यमातून सुरक्षा?
गणेशोत्सव काळात लाखो भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही राज्य शासनाची प्राधान्यक्रमातील बाब असल्याचे सांगताना नागरिकांचे सहकार्यही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे गृहराज्यमंत्री कदम यांनी यावेळी नमूद केले. तसेच चेंगराचेंगरीची भीती असेल अशा ठिकाणचे एआय कॅमेरे लगेच याबाबत सूचित करतील. यानंतर पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना याबाबत कळवलं जाईल आणि ते गर्दीवर नियंत्रण आणतील. विशेष म्हणजे एआयच्या मदतीने कोणत्या वेळी कोणत्या रांगेत किती संख्या आहे हे अचूक कळू शकेल. त्यामुळे तातडीने खबरदारी घेणं सोपं जाईल. या पाहणीदरम्यान मंडळाचे सचिव सुधीर साळवी, अतिरिक्त पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.





