नोव्हेंबर महिना उजाडला तरी महाराष्ट्रातील हवामानात सध्या लक्षणीय अशा स्वरूपाची तफावत सध्या पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने एकीकडे 5 नोव्हेंबरपर्यंत राज्याच्या विविध भागांत तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अद्यापही ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हवामानातील या विचित्र अशा स्वरूपाच्या बदलांचा शेती क्षेत्राला मात्र मोठा फटका बसताना दिसत आहे. हवामानाची एकूण स्थिती जाणून घेऊ…
मराठवाडा, विदर्भात ऊन-पावसाचा खेळ
गेला आठवडाभर राज्यासह संपूर्ण मराठवाड्यात पाऊस पहायला मिळाला. आता मात्र नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दोन दिवसापासून मराठवाड्यात पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. दमट हवामानामुळे दुपारचा वेळी नागरिक घामाघूम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये ‘ऑक्टोबर हीट’चे चटके सहन करावे लागत आहेत. 2 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परंतु कोणत्याही जिल्ह्याला जोरदार पावसाचा अलर्ट दिलेला नाही.
नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस वाटण्याची शक्यता आहे. वाढलेले तापमान आणि दमट हवामान यामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो. 5 ते 8 तारेखेच्या दरम्यान नांदेड जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बीड, परभणी, जालना आणि हिंगोली, लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस च्या आसपास तर तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस च्या दरम्यान राहील.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाने नागरिक हैराण
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या सर्वच जिल्ह्यांत कमी अधिक प्रमाणात सातत्याने पाऊस पाहायला मिळत आहे. सततच्या पावसामुळे रब्बी हंगामाची अनेक भागांत अद्याप सुरूवात झालेली नाही. 5 नोव्हेंबरनंतर पाऊस पुर्णपणे उघडीप देईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा खरिप हंगामा एकीकडे वाया गेलेला असताना रब्बी हंगामाला देखील उशीर होताना सध्या दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या कमालीचे चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.






