Marathi News

मोनो रेलबाबत एमएमआरडीएचा मोठा निर्णय; मोनो ओव्हरलोड झाल्यास पुढे जाणार नाही, सुरक्षिततेसाठी निर्णय

Written by:Rohit Shinde
Published:
मोनोरेलमध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्याने घडलेल्या घटनेनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरक्षेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मोनो रेलबाबत एमएमआरडीएचा मोठा निर्णय; मोनो ओव्हरलोड झाल्यास पुढे जाणार नाही, सुरक्षिततेसाठी निर्णय

दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये मोनोरेल बंद पडल्याने मोठी जीवितहानी होण्याची भिती निर्माण झाली होती. त्यानंतर सर्व प्रवास सुखरूप होते. मात्र आता यासंदर्भात एक मोठा निर्णय समोर येत आहे. मोनोरेलमध्ये प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्याने घडलेल्या घटनेनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरक्षेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मोनो ओव्हरलोड झाली तर…

आता पुढे मोनोरेल गाडीत 104 टनांपेक्षा जास्त प्रवासी असल्यास ती गाडी मार्गावर सोडली जाणार नाही. तसेच गाडीमध्ये ओव्हरलोड झाल्यास प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवूनच गाडी पुढे पाठवली जाईल. मोनोरेलच्या गाड्यांची रचना 104 टनांपर्यंतच्या क्षमतेसाठी केली आहे, परंतु गेल्या 10 वर्षांपासून या गाड्या धावत असल्याने त्यांची कार्यक्षमता काही प्रमाणात घटली आहे. त्यामुळे भविष्यात अपघाताचा धोका टाळण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याचा निर्णय एमएमआरडीएकडून घेण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी काय घडलं?

मंगळवारी घडलेल्या घटनेत, प्रवासी क्षमतेची मर्यादा 562 असतानाही एका गाडीत 582 आणि दुसऱ्या गाडीत 566 प्रवासी असल्याचे आढळले. जादा भारामुळे वळणावर गाडी झुकली आणि करंट कलेक्टर व पॉवर रेल यांचा संपर्क तुटला. त्यामुळे गाडी अचानक थांबली आणि ब्रेक न सुटल्याने ती पुढे नेता आली नाही. अग्निशमन दलाच्या मदतीने प्रवाशांची सुटका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रत्येक गाडीत सुरक्षा रक्षक तैनात करण्यासोबत मोनो पायलटसह एक तांत्रिक कर्मचारी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक मोनोरेलमध्ये 8 आपत्कालीन खिडक्या असतात. त्यांची तपासणी करून स्पष्ट दिशादर्शक लेबल लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत काय करावे याची माहिती फलकांवर स्पष्ट करण्यात येणार आहे.

खरंतर पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईतील प्रवाशांची सुरक्षितता हा खरंतर मोठा प्रश्न बनतो. लोकल सेवा ठप्प झालेली असते, त्यामुळे प्रवाशी जमेल त्या वाहनाने प्रवास करत असतात. अशावेळी प्रवाशांच्या जीव नेहमीच टांगणीला लागलेला असतो. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना योग्य ती काळजी घेणे, आणि सुरक्षित प्रवास करणे अत्यंत आवश्य असते.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews