Marathi News

मुंबई विमानतळ गुरूवारी 6 तास बंद राहणार; प्रवाशांच्या गैरसोयीचे कारण नेमके काय?

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारी, 20 नोव्हेंबर 2025 रोजी तब्बल 6 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. दुरूस्तीच्या कामांमुळे दोन्ही रनवे बंद असणार आहेत.
मुंबई विमानतळ गुरूवारी 6 तास बंद राहणार; प्रवाशांच्या गैरसोयीचे कारण नेमके काय?

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे महत्व अत्यंत मोठे आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे वर्दळीचे विमानतळ म्हणून येथे दररोज हजारो देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे ये-जा करतात. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जगभराशी जोडण्याचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. मात्र उद्या गुरूवारी या विमानतळावरील दोन्ही रन वे 6 तासांसाठी बंद असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना काहीसा मनस्ताप खरंतर सहन करावा लागणार आहे. देखभाल आणि दुरूस्तीच्या कामांसाठी हे रन वे बंद राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दोन्ही रन-वे 6 तासांसाठी बंद राहणार

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारी, 20 नोव्हेंबर 2025 रोजी तब्बल 6 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. खरंतर येथे उद्या पावसाळ्यानंतरच्या वार्षिक देखरेख आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत दोन्ही रनवे ( RWY 09/27 आणि RWY 14/32) उड्डाणांसाठी उपलब्ध राहणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरक्षा तपासणी आणि दुरुस्ती करत असताना कमीत कमी व्यत्यय येईल, यासाठी या संदर्भात विमान कंपन्यांना काही महिन्यांपूर्वीच माहिती दिली होती.

पावसाळ्यानंतर विमानतळावरील दोन्ही दुरुस्ती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत उड्डाण वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांची योग्य व्यवस्था करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाने 6 महिन्यांपूर्वीच याची कल्पना सर्व विमान वाहतूक कंपन्यांना दिली होती. जेणेकरुन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.

उड्डाणे प्रभावित होणार, प्रवासी चिंतेत

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षितता आणि सुरक्षेशी निगडीत सर्वोच्च दर्जा राखते. पावसाळ्यानंतरच्या वार्षिक दुरुस्ती योजनेचा भाग म्हणून दोन्ही क्रॉस रनवे गुरुवारी 6 तासांसाठी तात्पुरते बंद राहाणार आहे. दरम्यान, रनवेच्या दुरुस्तीमध्ये तपशीलवार तपासणी, धावपट्टीवरील लाइट्स, मार्किंग आणि ड्रेनेश सिस्टीमचे तांत्रिक मूल्यांकन यांचा समावेश असणार आहे.

उड्डाणांचे वेळापत्रक आणि कर्मचारी व्यवस्थापन सुरळीत राहावे, यासाठी सहा महिन्यांपासून सर्व भागधारकांसोबत समन्वय सुरू होता. आमच्यासाठी सुरक्षितता महत्त्वाची आहे. देखरेख कालावधी पूर्वनियोजित असल्यामुळे विमान कंपन्यांनी त्यांच्या फ्लाइट शेड्युलमध्ये आवश्यक बदल आधीच केले आहेत. त्यामुळे उड्डाणे रद्द किंवा विलंबित होण्याची शक्यता कमी असून प्रवाशांना कमीतकमी अडथळा येईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews