Marathi News

मुंबईला 72 तास शक्‍ती वादळाचा धोका; हवामान विभागाचा अंदाज काय?

Written by:Rohit Shinde
Published:
महामुंबईला 72 तास शक्‍ती वादळाचा धोका वर्तवण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाल्यास मुंबईच्या किनारीपट्ट्याला याचा मोठा धोका संभवतो.
मुंबईला 72 तास शक्‍ती वादळाचा धोका; हवामान विभागाचा अंदाज काय?

मान्सून मुंबईत दाखल झाला असून कमी दाबाचं क्षेत्र मुंबई आणि कोकणाच्या किनारी भागात सक्रिय असल्याचं दिसत आहे. अशा परिस्थितीत महामुंबईला 72 तास शक्‍ती वादळाचा धोका संभवतो. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर ‘शक्‍ती’ चक्रीवादळात झाल्यास त्याचा महामुंबईला थेट धोका संभवतो. हवामान खात्याचे शास्त्रज्ञ या चक्रीय स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

शक्ती वादळ निर्माण होणार?

येत्या 48 ते 72 तासांत या वादळाचा काय तो निकाल लागेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात झालेले नाही. मात्र, अरबी समुद्रात घोंगावणारा हा पट्टा हळूहळू शक्‍तीशाली होत आहे. चक्रीवादळात रूपांतर होण्याइतकी ताकद त्यात उत्पन्‍न झाल्यास हे चक्रीवादळ ‘शक्‍ती’ नावाने ओळखले जाईल. महाराष्ट्र आणि गोवा ही दोन्ही राज्ये या वादळाच्या तडाख्यात सापडू शकतात. मुंबई, ठाणे परिसराला आधीच वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, रायगड जिल्ह्यालाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर हवामान खात्याच्या सर्व नजरा अरबी समुद्रात उद्भवलेल्या संकटाचे पुढे काय होते याकडे लागल्या आहेत.

राज्यभरात पावसाची स्थिती कायम

हवामान विभागाने आज प्रामुख्याने राज्यातील तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणासह राज्यात अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात 27 मे रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यातील सातारा वगळता उर्वरीत तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे.  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे इथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात इतर ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews