Uddhav and Raj Thackeray : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी दिल्लीत कारस्थान? मराठी अस्मितेवर काय म्हणाले ठाकरे बंधू?

Written by:Smita Gangurde
Published:
ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी मुंबई आणि मराठी अस्मितेबाबत स्पष्ट आणि परखडं मतं मांडली आहेत. 
Uddhav and Raj Thackeray : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी दिल्लीत कारस्थान? मराठी अस्मितेवर काय म्हणाले ठाकरे बंधू?

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची युती झालीय. मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन दोन्ही ठाकरे बंधू जनतेसमोर आले आहेत. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी मुंबई आणि मराठी अस्मितेबाबत स्पष्ट आणि परखडं मतं मांडली आहेत. यात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा डाव, मराठी माणसाच्या अस्तित्वावर मुंबईत घालण्यात आलेला घाला, याबाबत ठाकरे बंधू बोलले आहेत.

मुंबई तोडण्याचा दिल्लीत डाव – उद्धव ठाकरे

जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केलंय. याबाबत उद्धव-राज ठारेंना मुलाखतीत विचारणा केली असता, त्यांनी दिल्लीकडे बोट दाखवत भाजपवर निशाणा साधलाय. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं कारस्थान दिल्लीत सुरु असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. दिल्लीत बसलेले वेगळा विचार करत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात, याला काहीच महत्त्व उरत नाही, असंही ते म्हणालेत.

तर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या हातात काहीच नाही असं सांगत, दिल्लीतून आलेले आदेश त्यांना पाळावे लागतात, असं म्हटलंय. दिल्लीतून आलं की कोणती जमीन अदानींना द्यायची, त्यावेळी त्यांना ती द्यावी लागते, असं सांगत त्यांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींवर महाराष्ट्रात हस्तक्षेप करत असल्याचे आरोप केलेत. मुंबईची महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही. मात्र मुंबईची ओळख, संस्कृती, आत्मा मारण्याचा प्रयत्न सुरु असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय. गुजरातीचं वाढतं प्रस्थ, हिंदीची सक्ती यातून मराठी भाषा, संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. नावापुरती मुंबई महाराष्ट्रात ठेवायची पण तिची ओळख पुसून टाकायची असा प्रयत्न होत असल्याची टीका उद्धव यांनी केलीय.

मुंबई तोडण्याचाच डाव- राज ठाकरे

मुंबईतील संपत्ती गुजरातकडे वर्ग करण्यात येत असल्याच्या चर्चेत राज ठाकरेंनी वेगलं मत मांडलंय. केवळ संपत्तीच नाही तर मुंबईचा तुकडा गुजरातला जोडण्यासाठी प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी काही मोजक्या धनदांडग्यांची ही मागणी होती. आता या संख्येत भर पडल्याचं राज ठाकरे म्हणालेत. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं नियोजन सुरु असून, पालघर, नवी मुंबई परिसरात सुरु असलेल्या विकासावर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. वाढवण, त्याला लागून विमानतळ यातून गुजरातच्या अधिक जवळ मुंबईतील सर्व व्यवसाय आणि व्यवहार नेण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही राज यांनी केलाय.

सध्या मुंबईत असलेलं विमानतळ नवी मुंबी हलवण्यात येईल आणि मुंबई विमानतळाची जागा विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल, असंही राज ठाकरे म्हणालेत. सध्या हे विमानतळ अदानींच्या ताब्यात आहे, या जागेत किमान 50 शिवाजी पार्क उभी राहू शकतात असंही ते म्हणालेत. हा सगळा मुंबई तोडण्याच्या नियोजनाचा भाग असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मराठी माणसाला जर मुंबईतून हद्दपार व्हायचं नसेल, तर या निवडणुकीत ठाकरे युतीला सत्ता देण्याची गरजही दोन्ही नेत्यांनी मुलाखतीत व्यक्त केलीय.

Follow Us :GoogleNews