मुंबईतील नवरात्री हा उत्सव अतिशय भव्य आणि रंगीबेरंगी पद्धतीने साजरा केला जातो. या काळात देवीच्या मंडपांना आकर्षक सजावट केली जाते आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषतः दांडिया आणि गरबा या नृत्यांचा मोठ्या प्रमाणावर आनंद घेतला जातो. मुंबईतील विविध भागात नवरात्री उत्सवाला खास ओळख आहे. या काळात भक्तांची आणि उत्सवाचा आनंद घेणाऱ्या तरूण-तरूणींची मोठा गर्दी होत असते. अशा काळात सुरक्षितता देखील तेवढची महत्वाची असते. यासाठी मुंबई पोलिसांकडून चोख नियोजन करण्यात आले आहे.
नवरात्रीसाठी मुंबई पोलीस सज्ज
गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवही निर्विघ्न आणि शांततेत पार पडावा यासाठी मुंबई पोलिसांनी पूर्णपणे तयारी केली आहे. गरबा, दांडियांवर पोलिसांची बारीक नजर असणार आहे. मुले, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार असून छेडछाड तसेच इतर प्रकार रोखण्यासाठी गरबा आयोजकांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतच्या अनेक सूचना पोलिसांनी काढलेल्या परिपत्रकामध्ये आहेत.
मुंबईला सणांच्या कालावधीमध्ये धोका, धमक्यांचे प्रमाण वाढते. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवादरम्यान कोणताही घातपात अगर अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या वतीने त्यांच्या हद्दीतील मंडळाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्या बैठका घेऊन उत्सव कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गर्दीच्या ठिकाणी चोख बंदोबस्त
मुंबईच्या महालक्ष्मी, मुंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबई महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागातून भाविक या ठिकाणी गर्दी करतात. दोन्ही मंदिर परिसरात जत्रेसारखे चित्र असते. त्यामुळे या दोन्ही मंदिर परिसरात विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नवरात्रोत्सव कालावधीत समाजमाध्यमांवरही बरीच खळबळ सुरू असते. यातून धार्मिक भावना दुखावतील, समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट कुणी करू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सायबर पोलिसांची यावर विशेष नजर आहे.






