नवले पुलावरील अपघात नियंत्रणासाठी नवा नियम; ‘तो’ नियम न पाळल्यास मोठा दंड

Written by:Rohit Shinde
Published:
नवले पुलावरील वाढते अपघात हे पुणेकरांसाठी मोठी चिंता बनली आहे. अशा परिस्थितीत वाहतूक विभागाकडून आता नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
नवले पुलावरील अपघात नियंत्रणासाठी नवा नियम; ‘तो’ नियम न पाळल्यास मोठा दंड

नवले पुलावरील वाढते अपघात हे पुणेकरांसाठी मोठी चिंता बनली आहे. या पुलावर सतत वाढणारी वाहनांची गर्दी, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि उताराचा तीव्र उतार यामुळे अपघातांची शक्यता अधिक वाढते. अनेक वेळा ट्रक आणि कंटेनर अनियंत्रित होऊन इतर वाहनांना धडक देतात, ज्यामुळे गंभीर जखमी आणि जीवितहानी होते. वाहतूक विभागाने अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी कठोर अंमलबजावणीची गरज कायम आहे. वेग नियंत्रण, सीसीटीव्ही पाळत आणि सतत देखरेख वाढवणे अत्यावश्यक आहे. नागरिकांनीही वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, तरच या वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळू शकते. त्यादृष्टीने पुणे वाहतूक विभागाकडून आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत.

वेग मर्यादेचा हा नियम पाळावा लागणार !

कात्रज बायपासवरील नवले पुलाजवळ वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक विभागाने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 25 नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारपासून या संपूर्ण मार्गावर वाहनांसाठी नवीन वेगमर्यादा लागू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच नवले पुलावर ब्रेक फेल झालेल्या कंटेनरमुळे 8 जणांचा मृत्यू झाला होता. ज्यामुळे प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला.

पुणे-मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज बायपास मार्गावर अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. भुमकर ब्रिज ते नवले ब्रिजच्या शेवटपर्यंत (कात्रज बायपास मार्ग) या संपूर्ण पट्ट्यात सर्व प्रकारच्या वाहनांसाठी जास्तीत जास्त वेगमर्यादा 30 किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी केवळ नवले पुलाच्या तीव्र उतारावर वेगमर्यादा ठरवण्यात आली होती. मात्र आता भुमकर चौक ते नवले ब्रीजपर्यंत संपूर्ण मार्गासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाई

नवले पुलावर तीव्र उतार असल्याने अनेकदा वाहनचालक गाडी न्यूट्रल करून वेगावर नियंत्रण गमावतात. हे टाळण्यासाठी वाहतूक विभागाने वाहनचालकांना या नव्या वेगमर्यादेचे कठोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्पीड गनच्या मदतीने लक्ष ठेवले जाईल आणि नियम मोडणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या नव्या नियमामुळे अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. मात्र, आता इतकी कमी वेगमर्यादा निश्चित केल्याने वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews