भारतीय हवामान विभागाने आजही पावासाचा मोठा इशारा दिला असून पुढील काही तास अत्यंत महत्वाचे आहेत. रविवारी राज्यातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले असून आज सोमवारच्या दिवशीही बराच पाऊस कोसळू शकतो असा अलर्ट देण्यात आला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसाने दसरा, दिवाळीतही राज्याला झो़डपून काढलं आहे. आता नोव्हेंबर महिना उजाडला, थंडीची चाहूल तर दूरच पण जोरदार पावसाचा इशारा असल्यामुळे घराघरातील छत्र्या अजूनही बाहेरच आहेत. पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणत नुकसान, पिकं खराब, त्यामुळे दैनंदिन जीवनावरही परिणाम होताना दिसतोय.
राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी
महाराष्ट्रात मे महिन्यापासून पावसाळा सुरू असल्याचे चित्र असून नोव्हेंबरमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे. मराठवाडा, विदर्भासह मुंबई आणि कोकणात देखील रविवारी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. त्याननंतर सोमवारी देखील राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील 4 जिह्यांना पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. कोकण विभागातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील असेच हवामान राहील. राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सोलापूर मध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात ढगाळ हवामान पहायला मिळेल.
मराठवाडा-विदर्भात पावसाचा अंदाज
मराठवाड्यात धाराशिव, लातूर, आणि बीड या तीन जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तर छत्रपती संभाजीनगरसह उर्वरित जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात सोमवारी ढगाळ हवामान राहणार आहे. तसेच तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी वगळल्यास विदर्भात जोरदार पावसाची शक्यता नाही. तसेच सोमवारी कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा महत्त्वाचा अलर्ट नाही. 5 नोव्हेंबरपर्यंत हवामानाची हीच स्थिती राहणार असल्याने शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
राज्यात 6 नोव्हेंबरनंतर थंडी ?
नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्यात थंडीचा काही नामोनिशाण दिसत नाहीये. येता जात पडणाऱ्या पावसामुळे सामान्य नागरिक हैराण झाले असून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात थंडीची चाहूल सहा नोव्हेंबरनंतरच लागेल . अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी 6 नोव्हेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 6 ते 8 नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामाना तज्ञांनी वर्तवला आहे.






