Marathi News

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील एका आरोपीला अटक; पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार

Written by:Rohit Shinde
Published:
फलटण उपजिल्हा रूग्णालयीतल डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात सातत्याने नवे अपडेट्स समोर येत आहे. शिवाय यातील आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आली असून पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार आहे.
सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील एका आरोपीला अटक; पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार

सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.  फलटण पोलीस ठाण्याचे पीएसआय गोपाल बदाने आणि प्रशांत बनकर हे आपल्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र आता या प्रकरणातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे.

प्रशांत बनकरला अटक; बदने अद्याप फरार

पोलीस आरोपींचा शोध घेत होते. आता अखेर पोलिसांनी पहिली अटक केली आहे. पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे. आरोपींच्या शोधासाठी चार पोलीस पथकं रवाना झाली होती. आरोपींचा सर्वत्र शोध घेतला जात होता. त्यानंतर पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली आहे. त्याला पुण्यातून बेड्या ठोकल्याची माहिती आहे. प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला होता.

अखेर २४ तासांनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदने अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला डॉक्टर जिथे भाड्याच्या घरात राहत होती. त्या घराचा मालक प्रशांत बनकर होता. मागील काही दिवसांत त्याने महिला डॉक्टरचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा आरोप आहे.

दोषींना फाशीची शिक्षा देण्याची कुटुंबाची मागणी

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात महिला डॉक्टरने आत्महत्या केली. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलंय. त्यात तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहिलंय. पोलीस उपनिरीक्षक बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. तसंच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीनेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. तिच्यावर एका पोलीस उपनिरीक्षकाने सातत्याने बलात्कार केल्याचं समोर आलं. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावर वरिष्ठांचा दबाव असल्याचं सुसाईड नोटमधून समोर आलं. पीडित महिला डॉक्टर ही मूळची बीडच्या वडवणी तालुक्यातील होती. तिच्या मृत्यूची बातमी समजताच गावात शोकाकुल परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी जो कुणी दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews