महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी तसेच कांद्याचा साठा करून ठेवलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अडचणीची बाब समोर येत आहे. कारण परदेशातून कांद्याची घटलेली मागणी आणि देशातील इतर राज्यांतून आगामी काही दिवसात वाढणारा कांद्याचा पुरवठा यामुळे कांद्याच्या किंमतीत मोठी घट होण्याचा अंदाज आहे. नेमक्या बाजारात सध्या काय घडामोडी घडतायत, ते जाणून घेऊ…
ऐन दिवाळीत कांद्याचे दर घटणार !
आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची मागणी लक्षणीयरीत्या घटली आहे. बांगलादेश, श्रीलंका आणि इतर शेजारी देशांनी स्थानिक उत्पादन वाढवले आहे. त्यामुळे भारतातून निर्यातीला वाव उरलेला नाही. परिणामी, देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर वाढण्याची शक्यता अत्यल्प आहे. उशिराने लागवड झाल्याने खरीप कांद्याचे पीक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटकातील कांद्याची आवक सुरू असून ती नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू राहील. या काळात जुना रब्बी कांदा आणि नवीन खरीप कांदा दोन्ही बाजारात येणार असल्याने, पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यामुळे दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
लवकरच राजस्थान आणि गुजरातमधूनही नवीन कांद्याचा पुरवठा वाढेल. या सर्व घटकांमुळे बाजारात कांद्याचा बंपर स्टॉक उपलब्ध होणार असून, त्यामुळे भाव आणखी कोसळू शकतात, असा इशारा कांदा निर्यातदारांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अशी बातमी समोर येत आहे.
सध्या मार्केटमध्ये दराची काय स्थिती?
देशातील प्रमुख बाजारांमध्ये उन्हाळ कांद्याला केवळ २०० ते ९७५ रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या दरात आणखी घसरण झाल्यास कांदा उत्पादकांच्या अडचणींमध्ये भर पडणार आहे. कांदा निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकास सिंग यांनी सांगितले की, “परदेशातून मागणी घटल्याने निर्यात ठप्प झाली आहे. परिणामी, देशांतर्गत बाजारात साठा वाढत असून भाव कोसळण्याची शक्यता आहे. हे दर आणखी घसरल्यास शेतकरी चांगलेच अडचणीत येणार आहेत. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे.






