संत श्री ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांच्या पालखीने आता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. दोन्ही पालख्या आता पंढरपूराकडे मार्गक्रमण करत आहेत. पंढरी जवळ आल्याने वारकऱ्यांमध्ये एक उत्साह पाहायला मिळत आहे. तिकडे पंढरपूरात देखील आषाढी यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. पोलीस यंत्रणा आणि अनेक सेवक त्या ठिकाणी वारकऱ्यांची सुरक्षितता आणि सेवेसाठी सज्ज आहेत.
तुकोबारायांची पालखी सोलापूर जिल्ह्यात
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा काल इंदापूरमधून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर गावोगावी पालखी सोहळ्याचे स्वागत केले जात आहे. काही अंशी वारीचा अनुभव मिळावा या भावनेतून नागरिक वारी सोबत चालत आहेत. शेतात एकत्रित येत भोजनाचा आस्वाद घेत आहेत. इंदापूर सोडल्यानंतर पालखीने पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. शिवाय वारकऱ्यांची संख्या आता वाढताना दिसत आहे. पावसाळी वातावरणात देखील वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला मोठी गर्दी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे. धर्मपुरी येथे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी मंत्र्यांसह अनेक अधिकारीही टाळ वाजवत पालखी सोहळ्यात चालताना दिसले. आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे सपत्नीक मनोभावे दर्शन घेतले. आता वारकऱ्यांना पंढरपूर दृष्टीपथात दिसत आहे.






