Marathi News

टोल माफी ते विम्याचा लाभ; आषाढी वारीनिमित्ताने राज्य शासनाकडून वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

Written by:Smita Gangurde
Published:
यंदाची वारी स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
टोल माफी ते विम्याचा लाभ; आषाढी वारीनिमित्ताने राज्य शासनाकडून वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा

अख्खा महाराष्ट्र ज्याची प्रतीक्षा करतो ती पंढरीची वारी जूनपासून सुरू होणार आहे. यंदाचा वारी सोहळा १८ आणि १९ जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. संत तुकारामाचा पालखी सोहळा १८ जूनला देहूतून प्रस्थान करेल, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं १९ जूनपासून प्रस्थान होणार आहे. आषाढीच्या या वारी सोहळ्याला महाराष्ट्रातील वारकरी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने सहभागी होत असतो. या वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे.

वारकऱ्यांना संरक्षण विमा

आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. याशिवाय वारकऱ्यांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा पुरवल्या जाणार आहेत. आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांच्या  समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल २८ मे रोजी सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती. यावेळी वारकऱ्यांची वारी आनंदात व्हावी यासाठी चर्चा करण्यात आले आणि त्यादृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

टोलमध्ये सवलत…

गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारीमार्गातील अनेक रस्ते खराब झाल्याचं समोर आलं. वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी अशा मार्गांची डागडुजी करण्याची सूचना देण्यात आली आहे. याशिवाय वारकऱ्यांना पाण्याची सुविधा, वीज जोडणी, तंबू उपलब्द करू देणे या सर्व सोयीसुविधा पुरवल्या जाणार आहेत. वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोलमध्ये सवलत दिली जाईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.

वारीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल. पोलीस आणि पीडितांमधील समन्वयासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येणार आहे. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात, वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल, अस आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

Follow Us :GoogleNews