बाईक टॅक्सीला शहरी भागात वाढती पसंती मिळत आहे कारण ती स्वस्त, वेगवान आणि रहदारीतून सहज मार्ग काढणारी सेवा ठरत आहे. प्रवाशांना कमी वेळेत गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी बाईक टॅक्सी हा एक सोयीस्कर पर्याय ठरतो. परंतु याच सेवेत अनेकदा नियमांचे उल्लंघन होताना दिसते. परवाना नसलेले चालक, सुरक्षिततेचे नियम पाळले न जाणे, हेल्मेटचा अभाव आणि वाहतूक कोंडी वाढविणाऱ्या घटना यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. सरकार आणि वाहतूक विभागाने योग्य नियमन, परवानाधारक चालकांची खात्री आणि सुरक्षिततेवर भर दिल्यास ही सेवा अधिक परिणामकारक आणि लोकांसाठी सुरक्षित ठरू शकते. आता या संदर्भात परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे.
अवैध सेवा चालविणाऱ्यांवर कारवाई
महाराष्ट्र परिवहन विभागाने अलीकडेच विशेष दंडात्मक कारवाई करत विविध बाईक टॅक्सी चालकांकडून अवैध सेवा चालवल्याबद्दल 57 वाहनांवर कारवाई केली आणि 1.5 लाख रुपयांचा दंड वसूल केला. राज्य सरकार ई-बाईक टॅक्सी धोरण अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही वाहन मालक किंवा कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल, असे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले. परवाना न घेता बाईक टॅक्सी सेवा चालवणाऱ्या Rapido, Ola आणि Uber सारख्या कंपन्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत की, मुंबई महानगर प्रदेशात परवाना न घेता बाईक टॅक्सी सेवा सुरू आहेत, त्यामुळे सरकारने या सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र सरकारचा कारवाईचा बडगा
एकीकडे या सेवेला वाढती पसंती मिळत असताना सरकारने मात्र नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारने बाईक टॅक्सी सेवा चालवणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अनेक दिवसांपासून या कंपन्या विना परवाना सेवा देत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने ही कारवाई केली आहे. सध्या ई-बाईक टॅक्सी ॲग्रीगेटर धोरण निश्चित करण्याची फाईल विधी व न्याय विभागात विचाराधीन आहे. लवकरच यावर निर्णय घेतला जाईल.






