फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Written by:Rohit Shinde
Published:
मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटण प्रकरणात महिला आयपीएस अधिकार्‍यांच्या नेतृत्त्वात एसआयटी गठीत करा, असे आदेशच पोलीस महासंचालकांना दिले आहे.
फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश
फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या  प्रकरणामुळे महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे.  या प्रकरणी रोज नव नवीन खुलासे होत आहे. या प्रकरणाची एकीकडे चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटण प्रकरणात महिला आयपीएस अधिकार्‍यांच्या नेतृत्त्वात एसआयटी गठीत करा, असे आदेशच पोलीस महासंचालकांना दिले आहे.

फलटणच्या घटनेची SIT मार्फत चौकशी होणार

या प्रकरणात अनेक नावांचा समावेश असल्याने, त्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली. सातारा पोलिसांनी याची चौकशी केली तर त्यांच्यावर दबाव राहू शकतो, त्यामुळे एसआयटी चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत होती. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर आरोपांची राळ उठवली. या प्रकरणात त्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच महिला डॉक्टरची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा दावा करत त्यांनी एसआयटी चौकशीच मागणी केली होती.  त्यानंतर आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाणार आहे. 

फलटण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. या प्रकरणी राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही त्या भगिनीचा आदर करतो, मात्र या प्रकरणातील इतर दोन आरोपींशी झालेले तिचे चॅट समोर आले तर एक गंभीर ट्रँगल समोर येऊ शकतो. तो लोकांसमोर आणण्यासारखा नसल्याने पोलीस शांत असल्याचं जयकुमार गोरे म्हणाले.

फलटणमध्ये नेमकी काय घटना घडली ? 

फलटण इथं २३ ऑक्टोबर २०२५ च्या रात्री उशिरा आढळला होता. फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलेचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळला. मृत्यूपूर्वी डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये तिने दोन व्यक्तींची नावं नमूद केली होती. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदणे, याच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. तर सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रशांत बनकर याच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला. तिने या दोघांची नावं हातावर लिहिलेली होती. या प्रकरणी  दोन्ही आरोपींवर बलात्कार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणात रोज नवेनवे खुलासे होत असून अनेक संशयास्पद गोष्टी समोर येत आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews