गणेशोत्सव काळात पुण्यातील वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी यंत्रणा सज्ज; पोलीस अलर्ट मोडवर, कसे असेल नियोजन?

Written by:Rohit Shinde
Published:
पुण्यात गणेशोत्सवासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक नियोजनाची तयारी केली असून शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.
गणेशोत्सव काळात पुण्यातील वाहतुकीच्या व्यवस्थापनासाठी यंत्रणा सज्ज; पोलीस अलर्ट मोडवर, कसे असेल नियोजन?

27 ऑगस्टला श्री गणेशाच्या प्रतिष्ठापनेने गणेशोत्सवाची सुरूवात होत आहे. पुणे शहरात गणेशोत्सवासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक नियोजनाची तयारी केली असून शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलिस आयुक्तांनी मंडळांना भेट देऊन पाहणी केली. गणेशोत्सव काळात महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके तैनात असतील. शहरातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी टाळण्याचे नियोजन

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सकाळी मानाच्या गणेश मंडळांसह मध्यवर्ती भागातील महत्त्वाच्या गणेश मंडळांना भेट देऊन मंडप, परिसरातील वाहतूक आणि बंदोबस्त याची पायी फिरून पाहणी केली. त्यांनी मेट्रो स्थानकांचीही पाहणी केली. या वेळी सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, पंकज देशमुख, उपायुक्त कृषिकेश रावले आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त हिमंत जाधव उपस्थित होते. पाहणीनंतर पोलिस आयुक्तांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी माहिती दिली.

‘यंदाच्या गणेशोत्सवात पुणेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी सर्वसमावेशक नियोजन आखलं आहे. मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील अनेक मार्गांवर अडथळे निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक आणि सुरक्षेची तयारी करण्यात येत आहे,’ अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी दिली.

महिला सुरक्षेला उत्सवात प्राधान्य

राज्यातील सर्वांत मोठा उत्सव असल्याने सुरक्षेवरही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके तैनात राहतील. समाजकंटकांवर तत्काळ कारवाई होईल. मोबाइल सर्व्हेलन्स युनिट्स म्हणजेच ‘मिनी कंट्रोल रूम’ तयार करून चौकशी गतिमान करण्यात येईल. गुन्हे शाखा सतत गस्त घालून बेकायदा कृत्यांवर कारवाई करील. प्रमुख चौक व मंडळ परिसरात सीसीटीव्ही निरीक्षण वाढविण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात चोरीच्या तसेच महिलांच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होत असते. अशा परिस्थितीत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. पोलीस देखील त्यादृष्टीने सतर्क असणार आहेत, लवकरच त्यासाठी काही हेल्पलाईन जारी केल्या जाणार आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews