राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला असून ठाकरे बंधूंनी एकत्र येत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीची घोषणा केली आहे. मनसे आणि शिवसेना युतीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी या युतीची टिंगल उडवली आहे. तसेच ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय समीकरण बदलणार नाही असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील राजकीय युतीची अधिकृत घोषणा अखेर आज झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अखेर महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र आले आहेत. आगामी काळात होणाऱ्या सभेमध्ये याबाबत अधिक बोलू असे राज ठाकरे म्हणाले.
ठाकरे बंधुंच्या युतीची अधिकृत घोषणा
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अखेर बुधवारी घोषणा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मनसे-ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. राज आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष मुंबईसह सात महानगरपालिकांमध्ये एकत्र लढणार आहेत.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांचे युतीच्या घोषणेकडे लक्ष लागले होते. या पत्रकार परिषेदपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले होते. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे असे संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी सहज टीव्ही बघत होतो. त्यावेळी काही माध्यमं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीचा कार्यक्रम असा दाखवत होती की, जणूकाही रशिया- युक्रेनची युती होत आहे. इकडून झेलेन्स्की निघाले, तिकडून पुतीन निघाले आणि युती झाली. कुठल्याही एकाद्या पक्षाला निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवायला जे काही करावे लागते तेच हे दोन्ही पक्ष करत आहेत. या दोन्ही पक्षांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी हे केले आहे. त्यापलीकडे या सगळ्याचा फार काही अन्वयार्थ काढण्याची गरज नाही. यामुळे फारकाही परिणाम होईल असे वाटत नाही असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवाय आणखी दोन-चार जणांना सोबत घेतले तरी काही फरक पडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.






