महाराष्ट्रावरील अवकाळी पावसाचे ढग काही केल्या दूर होताना दिसत नाही. बंगालचा उपसागर तसेच अरबी समुद्रातील बदलत्या वातावरणाचा परिणाम राज्यातील हवामानावर होताना दिसत आहे. दक्षिण भारतातील तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात पावसाची स्थिती कायम आहे. आज अनेक भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पाऊस बरसणार !
दिवसभर उकाडा वाढणार असला तरीही दुपारनंतर महाराष्ट्रातील तळ कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही पट्ट्यांमध्ये पाऊस पडू शकतो. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान पुण्यात पुढील दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑक्टोबर हिटमुळे वाढलेल्या उघड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शहर आणि परिसरात गुरुवार आणि शुक्रवार पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तापमानात मोठी घट झाली. तर आता पुढचे दोन दिवस मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबईतही पुढचे दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत गडगडाटसह वादळी पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्याला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. काल संध्याकाळपासूनच मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साचल्याच पाहायला मिळालं.
29 ऑक्टोबरनंतर पावसाची पूर्णपणे उघडीप ?
दरम्यान महाराष्ट्रातील पाऊस 29 ऑक्टोबरनंतर पूर्णपणे उघडीप देईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. 25 ते 29 ऑक्टोबरच्या दरम्यानच्या काळात राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस बरसण्याच्या अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण भारतात 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्याचा परिणाम परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे.






