Ashish Shelar – 26 मे रोजी मुसळधार पावसाने मुंबईची तुंबई केली. यानंतर शासन आणि प्रशासन सतर्क झाले आहे. याचाच एक भाग म्हणून कुणीही कुठल्याही परिस्थितीत दोषारोप न करता एक टीम म्हणून सगळ्यांनी एकत्रितपणे कामे करा. एमएमआरडीए, मेट्रोची सर्व प्राधिकरणे यांनी आपापसात समन्वय तर ठेवावाच सोबत मुंबई महापालिकेशी ही सतत संपर्क आणि समन्वय ठेवा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी आज दिले. मुंबईत मान्सूनपूर्व कामांच्या आढावा मंत्री आशिष शेलारांनी घेतला.
आराखडा तयार करा…
ज्या ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत त्यांची सुरक्षा तपासणी करा, भूमिगत मेट्रोमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करुन द्या, दुर्दैवाने कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली किंवा गाड्यांची गती कमी झाली तर अंधेरी, घाटकोपर सारख्या जास्त गर्दीच्या मेट्रो स्टेशनवरुन प्रवाशांना बाहेर काढणे, तसेच अन्य वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत एक आपत्कालीन आराखडा तयार करा, ज्यामध्ये मुंबई महापालिका आणि बेस्ट यांना समाविष्ट करुन घ्या, असे निर्देश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ उपाययोजना…
आपत्कालीन मदत सेवेसाठी 24×7 सेवा देण्यासाठी टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवणारी यंत्रणा प्रत्येक प्रकल्पासाठी उभारण्यात आली आहे. यामध्ये एमएमआरडीए व महामेट्रो या दोन्ही प्राधिकरणांकडून स्वतंत्र आपत्कालीन कंट्रोल रुम तयार करण्यात आला आहे. 114 किलोमीटरमधील बॅरिकेट हटविण्यात आले, 19 ठिकाणी रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहेत. 107 ठिकाणी पंप बसविण्यात आले आहेत. यासह पावसाळ्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती या बैठकीत देण्यात आली.





