ऐन दिवाळीत खासगी बसच्या भाड्यात तिप्पट वाढ; प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार!

Written by:Rohit Shinde
Published:
ट्रॅव्हल्स कंपन्यांनी भाडेवाढीचा ‘गीअर’ टाकला असून मोठ्या शहरात जाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. नागपूर, संभाजीनगर, मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे.
ऐन दिवाळीत खासगी बसच्या भाड्यात तिप्पट वाढ; प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार!

नुकतेच जीएसटी सुधारणा लागू झाल्या असून स्वयंपाक घरातील वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत दर कमी झाले आहेत. या सुधारणांत ट्रॅव्हल्स प्रवासासाठी ‘जीएसटी’ची सवलत मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, तिकीट बुकिंगवर 5 टक्के जीएसटी कायम आहे. त्यामुळे खासगी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री कायम आहे. ऐन दिवाळीच्या काळात काही ट्रॅव्हल्स कंपन्या तिप्पट भाडे आकारताना दिसत आहेत.

खासगी ट्रॅव्हल गाड्यात तिप्पट भाडे वाढ

दिवाळीत जर तुम्ही खासगी बसने प्रवास करणार असाल तर तुमचं दिवाळंच निघणार आहे. बाहेर जाताना तुम्हाला दुप्पट ते तिप्पट तिकीट दिऊन प्रवास करावं लागणार आहे. ट्रॅव्हल्स कंपन्यांनी भाडेवाढीचा ‘गीअर’ टाकला असून मोठ्या शहरात जाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. एकट्या संभाजीनगरातू नागपूरला जाण्यासाठी 4 हजार, तर मुंबईला जाण्यासाठी 2500 रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागणार आहे.

ट्रॅव्हल्स असोसिएशनने भाडेवाढीचा निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र, ऑनलाईन बुकिंग प्रणालीमध्ये दिवाळीच्या काळातील तिकीट दर दुपटीने, तिपटीने वाढण्याचे दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरहून सोलापूरला जाण्यासाठी सध्या 550 रुपये मोजावे लागतात. याच ठिकाणी दिवाळीत 1550 रुपयांपर्यंत मोजावे लागतील. पुण्यासाठी सध्या 581 तर दिवाळीत 1510 रुपये भाडे दिसत आहे. मुंबईला सध्या 800 तर दिवाळीच्या काळात 2500 रुपये मोजावे लागतील. नागपूरसाठी आता  1230 आणि दिवाळीत तब्बल 4 हजार रुपये तिकीट दर दिसत आहेत.

प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार

नियमानुसार ट्रॅव्हल्सचालकांना ‘एसटी’ बसच्या तुलनेत दीडपट भाडे घेता येते. अधिक भाडे आकारल्यास प्रवासी तक्रार करू शकतात. तशी तक्रार आल्यास संबंदित ट्रॅव्हल्स मालकांवर आरटीओकडून कारवाई केली जाते. तर अनेक मार्गांवर ट्रॅव्हल्सचे भाडे हे एसटीपेक्षा कमी असल्याचाच दावा केला जातो.

दिवाळी सारख्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या संधीचा फायदा घेत अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या भाडे तिप्पटपर्यंत वाढवतात. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करणे परवडत नाही. नोकरी, शिक्षण किंवा गावी जाण्यासाठी प्रवास करणाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रेल्वे आणि एसटीमध्ये तिकीट मिळणे कठीण झाल्याने खासगी ट्रॅव्हल्स हा एकमेव पर्याय उरतो, पण वाढीव भाड्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागतो. सरकारने या भाडेवाढीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून वारंवार होत आहे. सणासुदीच्या आनंदात प्रवास खर्चामुळे काळजी वाढत आहे.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews