Marathi News

पुणे, अहिल्यानगर जिल्ह्याला पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Written by:Rohit Shinde
Published:
पुढील दोन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे व नाशिक जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे, अहिल्यानगर जिल्ह्याला पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक १५ व १६ सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे व नाशिक जिल्ह्यांमध्ये वीजांचा कडकडाट, जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याकाळात नागरिकांना आवश्यक ती सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय या काळात जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

धरणांतून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू

पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. सध्या भिमा नदीवर दौंड पूल येथे ४,३७६ क्युसेक, गोदावरी नदीवरील नांदूर मध्यमेश्वर धरणातून १,६१४ क्युसेक व जायकवाडी धरणातून ५६,५९२ क्युसेक, प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणातून ८२० क्युसेक व निळवंडे धरणातून ७०० क्युसेक, मुळा धरणातून ५०० क्युसेक तर कुकडी नदीवरील येडगाव धरणातून ७५० क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.

आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल-फ्री क्रमांक १०७७ असून दूरध्वनी क्रमांक ०२४१-२३२३८४४ व २३५६९४० उपलब्ध आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पाऊस, वीजांपासून अशी घ्या काळजी

पावसाळ्यात वीजांचा प्रकोप आणि मुसळधार पाऊस यामुळे अपघाताची शक्यता वाढते. जीवाची सुरक्षितता या काळात अत्यंत महत्वाची असते. सुरक्षिततेसाठी काही काळजी घेणे आवश्यक आहे. वीजांच्या कडकडाटात झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत उभे राहू नये. मोबाइल, टॉर्च किंवा धातूच्या वस्तू हातात ठेवणे टाळावे. घराबाहेर असताना सुरक्षित इमारतीत आसरा घ्यावा. पावसाच्या पाण्यात भिजलेल्या इलेक्ट्रिक तारांपासून दूर राहावे. पावसाळ्यात पाय घसरून अपघात होऊ शकतो, त्यामुळे योग्य पादत्राणे वापरावीत. पूरग्रस्त भागात पाण्यात उतरू नये. पावसाळ्यात आरोग्याचीही काळजी घ्यावी, उकळलेले पाणी प्यावे आणि गरम अन्न सेवन करावे. सावधानता बाळगल्यास पावसाचा आनंदही घेता येईल आणि सुरक्षितताही राखता येईल.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews