Marathi News

महाराष्ट्रावरील पावसाचे संकट आणखी गडद; 25 ते 29 सप्टेंबर मुसळधार पाऊस बरसणार!

Written by:Rohit Shinde
Last Updated:
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असून येत्या 25 सप्टेंबर पासून ते 29 सप्टेंबरपर्यंत पावसाचा धोका कायम आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. तर 27 सप्टेंबरला राज्यभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 
महाराष्ट्रावरील पावसाचे संकट आणखी गडद; 25 ते 29 सप्टेंबर मुसळधार पाऊस बरसणार!

महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे. पावसामुळे राज्यात मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. दरम्यान पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील पाच दिवस मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असून येत्या 25 सप्टेंबर पासून ते 29 सप्टेंबरपर्यंत पावसाचा धोका कायम आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. तर 27 सप्टेंबरला राज्यभरात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात आठ जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात कोकणातील रायगड आणि रत्नागिरीसह, पुणे घाटमाधा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी, सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि खूप महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भ-मराठवाड्याला सर्वाधिक धोका

पुढील 24 तासांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा निर्माण होणार आहे, त्यामुळे पुढचे पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार 25 सप्टेंबर पासून ते 29 सप्टेंबरपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर येत्या 27 सप्टेंबरला मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे याच काळात विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील पाच दिवस मराठवाडा आणि विदर्भाला पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या पार्श्वभूमीवर मच्छिमार बांधवांना समुद्रात न जाण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

पावसामुळे राज्यभरात मोठे नुकसान

राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्याला तर पावसाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. उभी पिकं पाण्याखाली गेली असून, शेतकरी हवालदिल झाली आहेत, नद्यांना आलेल्या पुरामुळे तर परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून, अनेक जण गावातच अडकले आहेत, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे.पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews