राज्यातील पावसाच्या स्थितीमध्ये सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. हवामान सातत्याने बदलताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाची तीव्रता वाढलेली दिसून येते. मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत भरपूर पावसाची नोंद झाली आहे. आगामी काही दिवसांत पावसाची स्थिती कशी राहिल? हवामान विभागाने पावसाबाबत काय अंदाज वर्तवला ते सविस्तर जाणून घेऊ…
राज्यात पावसाची स्थिती कशी राहणार?
20 जुलै रोजीही राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई शहर तसेच उपनगरांमध्ये आकाश प्रामुख्याने ढगांनी आच्छादलेले राहणार असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये काही निवडक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागासह कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, अहिल्यानगर आणि धुळे जिल्ह्यांमध्ये काही भागांत विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा-विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस
मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी विजांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.विदर्भातील नागपूर आणि अमरावतीसह सर्व 11 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
खऱ्या अर्थाने मराठवाडा आणि विदर्भातील मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही. नागपूर भाग वगळता उर्वरीत विदर्भ आणि मराठवाड्याला मोठ्या तुफान पावसांची खऱ्या अर्थाने अजुनही गरज आहे. त्यामुळे शेतीत झालेली पेरणी, उगवलेली पीके यांना पावसाच्या कमतरतेमुळे धोका संभवतो. काही भागांत दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यात देखील नाकारता येत नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी मुसळधार पावसाची वाट पाहत आहेत.






